“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:02 AM2024-06-01T11:02:53+5:302024-06-01T11:06:54+5:30
Yogi Adityanath News: जे लोक अनैतिकता आणि दुराचार करतात, त्यांना आध्यात्मिक उपासनेचे महत्त्व समजू शकत नाही, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
Yogi Adityanath News: ज्यांच्या मनात भारत देशाबाबत श्रद्धाभाव नाही, जे भारताची शाश्वत मूल्ये आणि आदर्श मोडून काढणे हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश मानतात. ज्यांच्या आचरणामुळे जनतेने पुन्हा पुन्हा नाकारले आहे, ते लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानसाधनेची खिल्ली उडवू शकतात. पंतप्रधान मोदी यांची ध्यानसाधना देशाला फायदेशीर आणि लाभदायक ठरू शकेल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झंझावाती प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट कन्याकुमारी गाठले आणि मौन व्रत तसेच ध्यानसाधनेचा संकल्प केला. ४५ तास नरेंद्र मोदी ध्यानसाधना आणि मौन व्रताचरण करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या ध्यानसाधनेवरून विरोधकांनी खोचक टोलेबाजी करत टीकास्त्र सोडले. विरोधकांच्या या टीकेचा योगी आदित्यनाथ यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
त्यांना आध्यात्मिक उपासनेचे महत्त्व समजू शकत नाही
जे लोक अनैतिकता आणि दुराचार करतात, त्यांना आध्यात्मिक उपासनेचे महत्त्व समजू शकत नाही. आध्यात्मिक उपासना समजून घेण्यासाठी भारत आणि भारतासारखे मन आवश्यक आहे. भारताच्या शाश्वत मूल्ये आणि आदर्शांप्रती निष्ठेची भावना असणे आवश्यक आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सुनावले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील १३ जागांवर मतदान होत आहे. एकीकडे उन्हाच्या झळा वाढत आहेत. यावर बोलताना, प्रतिकूल हवामान असतानाही मतदारांनी उत्साह दाखवत मतदान करत आहेत. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.