योगींनी फटकारल्यानंतर स्वच्छतागृहातील केशरी टाईल्स हटवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 04:25 PM2018-06-04T16:25:07+5:302018-06-04T16:25:07+5:30
हरदोई दौऱ्यादरम्यान पांढऱ्या टाईल्स हटवून लावण्यात आल्या होत्या केशरी टाईल्स
लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हरदोई दौऱ्याआधी तेथील स्वच्छतागृहात केशरी टाईल्स लावण्यात आल्या होत्या. मात्र यावरुन वाद होताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यानंतर लगेचच केशरी टाईल्स हटवून तिथे पुन्हा पांढऱ्या टाईल्स लावण्यात आल्या.
रविवारी योगी आदित्यनाथ यांनी हरदोईचा दौरा केला. त्यांनी याठिकाणी 8 तास मुक्काम केला. आदित्यनाथ यांना खूष करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी केशरी रंगाचे पडदे लावले. मात्र अधिकारी एवढ्या वरच थांबले नाहीत. त्यांनी स्वच्छतागृहातील टाईल्सदेखील बदलल्या. योगी आदित्यनाथ येण्याआधी स्वच्छतागृहात पांढऱ्या रंगाच्या टाईल्स होत्या. मात्र आदित्यनाथ येण्याआधी या टाईल्स काढून तिथे केशरी रंगाच्या टाईल्स लावण्यात आल्या. फक्त योगींना खूष करण्यासाठी अधिकाऱ्यांनी हा उपद्व्याप केला.
गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील सरकार बदलल्यावर सरकारी इमारतींचे रंग बदलले होते. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात सरकारी इमारतींना केशरी रंग देण्यात आला. सरकारी शाळादेखील याला अपवाद नव्हत्या. त्यांनाही केशरी रंगात रंगवून टाकण्यात आलं. यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर प्रशासनानं पुन्हा इमारतींना रंग दिला आणि त्या पूर्ववत केल्या.