“PM मोदींच्या प्रेरणेने संयुक्त अरब अमिरातीत पहिले हिंदू मंदिर झाले”; योगींनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 04:06 PM2024-02-23T16:06:38+5:302024-02-23T16:06:53+5:30
Yogi Adityanath News: जग झोपते तेव्हा पंतप्रधान मोदी जागे असतात आणि जनहितासाठी काम करतात, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
Yogi Adityanath News: ५०० वर्षांचा प्रभू श्रीरामांचा वनवास संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलला प्रभूंना विराजमान केले. दूरदृष्टीने, वचनबद्धतेने राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला. अयोध्या धामासोबतच पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेने आणि प्रयत्नांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिले हिंदू मंदिर बांधण्यात आले. गेल्या आठवड्यात उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी काशीत आले आहे. काशी हे मंदिरांचे शहर आहे. आता जागतिक पटलावर सांस्कृतिकदृष्ट्या काशीचा प्रभाव वाढत आहे. अबुधाबीमध्ये बांधलेले मंदिर हेही याचे नवे उदाहरण आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. येथे अनेक कामांचे भूमिपूजन, लोकार्पण केले जाणार आहे. यानिमित्त एका कार्यक्रमांत उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. काशी सर्व ज्ञानाची राजधानी असेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
जग झोपी जाते, तेव्हा पंतप्रधान जागे राहून जनहिताची कामे करतात
गेल्या १० वर्षात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपत काशी शहर एका नव्या रूपात जगासमोर आले. रात्री ११ वाजता पंतप्रधान लोकप्रिय खासदार म्हणून आपल्या मतदारसंघात काशीत असताना विकासकामांचे निरीक्षण करताना सर्वांनी पाहिले असेलच. रात्री ११ वाजता जग झोपते तेव्हा पंतप्रधान जागे होते आणि जनहितासाठी काम करत होते. राजकारणी जनतेचा विश्वास कसा संपादन करू शकतो, हे या उदाहरणावरून आपल्याला समजते. देशाच्या विकासासोबत पंतप्रधान मोदी यांनी काशीला नवे रूप आणि समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ दिले, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.
दरम्यान, एक प्रेरणादायी संधी आहे. सामान्यतः लोकप्रतिनिधी म्हणजे विकासासाठी प्रयत्न करणे, परंतु पंतप्रधान मोदी खासदार म्हणून काशीशी नियमितपणे जोडलेले असतात. काशीच्या लोकांच्या हितासाठी काम करत असतानाच या ठिकाणच्या प्राचीन अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला ते जागतिक पटलावर प्रतिष्ठा मिळवून देत आहेत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.