“५०० वर्षांनी रामजन्मभूमी परत मिळू शकते, तर पाकमधून सिंधू का नाही?”: योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 08:03 PM2023-10-09T20:03:54+5:302023-10-09T20:04:47+5:30
CM Yogi Adityanath: १९४७ मध्ये फाळणी थांबवता आली असती. परंतु, केवळ एका व्यक्तीच्या हट्टामुळे भारताचा मोठा भाग वेगळा झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
CM Yogi Adityanath: ५०० वर्षांनी श्री रामजन्मभूमी परत मिळू शकते, तर पाकिस्तानमध्ये असलेला सिंधू का परत मिळू नये, असे मोठे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. सिंधी समाज संमेलनाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.
सिंधी समाज हा भारताच्या सनातन धर्माचा एक भाग आहे. १९४७ मध्ये झालेली देशाची फाळणी थांबवता आली असती. परंतु, केवळ एका व्यक्तीच्या हट्टामुळे भारताचा मोठा भाग पाकिस्तानच्या रूपाने वेगळा झाला. आजही फाळणीचे परिणाम दहशतवादाच्या रूपाने दिसून येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सीमेपलीकडील दहशतवाद भारतात शेवटच्या घटका मोजत आहे. जर श्री रामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेता येत असेल तर आपण पाकिस्तानमधून सिंधू परत घेऊ शकत नाही असे काही कारण नाही, असे विधान करत हे आताच्या पिढीला सांगा. तुमच्या पूर्वजांबद्दल सांगा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.
प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे
पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, नक्कीच यश मिळेल. प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे.पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेने काशी विश्वनाथ परिसराचा कायापालट झाला आहे. देशातील वारसास्थळांबाबतचा हा आदर आहे. अयोध्या, काशी विश्वनाथ धाम, माँ विंध्यवासिनी धाम, प्रयागराजला भेट द्या. राज्यात अनेक नवीन गोष्टी घडत आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार राम कथा संग्रहालय आणि आर्ट गॅलरी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला देण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. यासाठी लखनऊ येथे सामंजस्य करार करण्यात येणार आहे. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी होणार आहे.