Coronavirus: “१ तासांत ऑक्सिजन संपणार इतक्यात...”; कोरोनाबाधिताने गर्भवती बहिणीसह इतर रुग्णांचे प्राण वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:27 PM2021-05-11T20:27:48+5:302021-05-11T20:29:04+5:30
एकेदिवशी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपणार आहे अशी माहिती हॉस्पिटलच्या स्टाफने दिली. ऑक्सिजनचा साठा केवळ १ तासापुरता शिल्लक होता.
गोरखपूर – एकीकडे कोरोनामुळे नात्यांमध्ये दुरावा येणाऱ्या अनेक घटना वाचायला मिळतात तर दुसरीकडे माणुसकी जपणाऱ्याही घटना घडतात. गोरखपूरमध्ये संकटकाळात नाती कशी घट्ट असावीत याचं आदर्श उदाहरण समोर आलं आहे. याठिकाणी राहणारे पंकज शुक्ला आणि त्यांची गर्भवती बहिण दोघंही कोरोना संक्रमित होते. दोघांवर एकाच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
एकेदिवशी हॉस्पिटलमध्येऑक्सिजन संपणार आहे अशी माहिती हॉस्पिटलच्या स्टाफने दिली. ऑक्सिजनचा साठा केवळ १ तासापुरता शिल्लक होता. अशावेळी प्रत्येक जण आपापली व्यवस्था दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करत होतं. मात्र पंकज आणि त्याच्या बहिणीची सोय कुठेही झाली नाही. तेव्हा पंकजने स्वत: कमान हातात घेतली. कोविड पॉझिटिव्ह असूनही स्वत:च्या गर्भवती बहिणीसाठी आणि इतर रुग्णांसाठी तो रुग्णवाहिका चालवू लागला. अर्ध्या तासात त्याने ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पुन्हा परतला. या काळात त्याने दुसऱ्याला संक्रमण पसरणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली.
पंकज आणि त्याची बहिण कोरोनाला मात देऊन घरी परतलेत त्यानंतर ही कहाणी सगळ्यांसमोर आली. गोरखनाथ परिसरात राहणाऱ्या पंकज शुक्लाने सांगितले की, २० दिवसांपूर्वी मला ताप आला होता. तपासणी केली असता २१ एप्रिलला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याचवेळी गर्भवती बहिणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. घरात पंकज एकटा कर्ता पुरुष होता. त्याने रुग्णवाहिका बोलावून बहिणीला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि दोघंही एकाच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले.
ऑक्सिजनच्या कमीमुळे श्वास घेण्यास त्रास
२३ एप्रिलला बहिणीची तब्येत बिघडू लागली. तेव्हा डॉक्टरांनी तिला ऑक्सिजन लावावं लागेल असं सांगितले. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये केवळ १ तास ऑक्सिजन पुरेल एवढाच साठा असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे रुग्णांना इतरत्र जायाचं असेल तर जाऊ शकता असं हॉस्पिटलने सांगितले. प्रशासनाने हे सांगताच मला धक्काच बसला. मी तातडीने हॉस्पिटल प्रमुख आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना खूप विनवणी केली. ऑक्सिजन मिळत नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही असं पंकजला सांगण्यात आलं.
गोरखपूरच्या ऑक्सिजन गॅस एजेन्सीशी संवाद साधला तर सिलेंडर घेऊन आला तर भरून मिळेल असं पंकजला सांगण्यात आलं. त्यानंतर ऑक्सिजन आणण्यासाठी कोण जाणार? असा प्रश्न उभा राहिला. कारण रुग्णवाहिकेचा चालक आधीच पळाला होता. त्यानंतर पंकजने कर्मचाऱ्यांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये ठेवलेले सिलेंडर रुग्णवाहिकेत ठेवले आणि स्वत: रुग्णवाहिका चालवून ऑक्सिजन नेण्यासाठी पोहचले.
बहिणीसोबत इतर रुग्णांचेही प्राण वाचवले
हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा अभाव असल्याने अनेकांना समस्या उद्भवली. पंकजने वेळीच ऑक्सिजन सिलेंडर आणल्याने त्याच्या बहिणीसह दुसऱ्या रुग्णांचेही प्राण वाचले. हॉस्पिटलमधील १८ दिवस कसे गेले हे कधीच विसरणार नाही. प्रत्येक तासाला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज मला भीती घालत होता. मी तातडीने बहिणीकडे तिला पाहायला जात होतो.
कोरोनाशी लढून दोघं बहिण भाऊ घरी पोहचले
एका खासगी कंपनीत काम करणारा पंकज आणि त्याची गर्भवती बहिण दोघंही मंगळवारी सुखरूप घरी पोहचले. १४ दिवसानंतर त्या दोघांची चाचणी निगेटिव्ह आली. माझे वडिल या जगात नाहीत. त्यांच्या जाण्यानंतर माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आहे. बहिणीची चिंता सतत सतावत होती असं पंकजने सांगितले.
गोरखपूर ट्रामा सेंटरचे संचालक डॉ. राजेश श्रीवास्तव म्हणाले की, सुरुवातीच्या काळात ऑक्सिजनची समस्या होती. रुग्णवाहिकेचा चालक आजारी होता. त्यामुळे त्याने रुग्णवाहिका चालवण्यास नकार दिला. तेव्हा पंकजने स्वत: रुग्णवाहिका चालवली. पंकज कोरोना संक्रमित होता. सुरक्षेची सर्व खबरदारी घेत पंकज ऑक्सिजन प्लांटपर्यंत पोहचला आणि त्याने ऑक्सिजन हॉस्पिटलला पोहचवला.