"योगीजी यांना सोडू नका!’’, आई आणि बहिणींची हत्या करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:13 IST2025-01-01T15:21:09+5:302025-01-01T16:13:28+5:30
Uttar Pradesh Crime News: चार बहिणी आणि आईची हत्या करणारा आरोपी अरशद याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामधून त्याने धक्कादायक दावे केले आहेत. अरशद याने या घटनेसाठी आपल्या वस्तीतील लोकांना जबाबदार धरले आहे. तसेच त्याने काही आरोपींची नावंही घेतली आहेत.

"योगीजी यांना सोडू नका!’’, आई आणि बहिणींची हत्या करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
नववर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील एका हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील पाच महिलांची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ४ बहिणी आणि आई अशा पाच जणांची हत्या करणारा आरोपी मोहम्मद अरशद याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपी अरशद याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामधून त्याने धक्कादायक दावे केले आहेत. अरशद याने या घटनेसाठी आपल्या वस्तीतील लोकांना जबाबदार धरले आहे. तसेच त्याने काही आरोपींची नावंही घेतली आहेत.
या व्हिडीओमध्ये आरोपी मोहम्मद अरशद म्हणतो की, माझं नाव मोहम्मद अरशद आहे. आज आमच्या वस्तीमधील लोकांमुळे आणि त्यांच्यासोबतच्या वादामुळे थकूर हरून मी आज हे पाऊल उचललं आहे. आज मी माझ्या बहिणी आणि आईची हत्या केली. जेव्हा पोलिसांना हा व्हिडीओ मिळेल, तेव्हा त्यांनी यासाठी आमच्या वस्तीमधील लोक जबाबदार आहेत हे जाणून घ्यावे. त्यांनी आमचं घर हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आम्हाला खूप त्रास दिला. आम्ही त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण आमचं कुणी ऐकून घेतलं नाही. त्यामुळे मागच्या दहा-पंधरा दिवसांपासून नाईलाजास्तव आम्हाला फुटपाथवर झोपावं लागत आहे. थंडीत भटकावं लागत आहे.
आमचं राहतं घर त्यांनी हिसकावून घेतलं आहे. घराची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. ती आम्हाला मंदिराच्या नावावर करायची होती. त्याशिवाय आम्हाला धर्म बदलायचा होता. त्यामुळे सर्व कागदपत्रे आम्ही आमच्याकडे ठेवली आहेत. पोलिसांना हा व्हिडीओ मिळाल्यावर लखनौ पोलीस आणि योगी यांना एक विनंती आहे की, यांच्यासारख्या मुस्लिमांना सोडू नका. तुम्ही जे काही करत आहात, ते खूप चांगलं आहे. हे लोक जागोजागी जमिनीवर कब्जा करत आहेत. तसेच लोकांवर जुलूम करत आहेत. हे अनेक बेकायदेशीर गुन्ह्यांमध्ये गुंतले आहेत. तसेच बनावट नोटांचा धंदा करत आहेत, असा आरोपही त्याने केला.
आम्ही खूप दिवसांपासून या सर्वांविरोधात कारवाई करण्याचा खूप प्रयत्न केला. आमच्या मृत्यूसाठी संपूर्ण वस्ती जबाबदार आहे. त्यामधील मुख्य आरोपी रानू उर्फ आफताब अहमद, अलीम खान, सलीम ड्रायव्हर, अहमद, आरिफ, अझहर आणि त्यांचे नातेवाईक आहेत, असा आरोप आरोपी अरशद याने केला.
हे लोक खूप मोठी भूमाफिया गँग चालवतात. यामध्ये ते मुलींची विक्री करतात. आम्हाला कुठल्यातरी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून आमच्या बहिणींची हैदराबादमध्ये विक्री करण्याची यांची योजना होती. आमच्या घरासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीच्या माध्यमातून माझ्या बहिणींची विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आम्हाला हे होवू द्यायचे नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव मी माझ्या बहिणींचा गळा आवळून आणि हातांच्या नसा कापून मारले, अशी कबुलीही त्याने या व्हिडीओत दिली आहे. दरम्यान, अरशदला पोलिसांनी घटनास्थळावरूनच पकडले आहे. तर आरोपी वडील फरार आहेत.