मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:43 PM2024-10-22T12:43:30+5:302024-10-22T12:44:05+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे एका अधिकाऱ्याच्या पूर्व पत्नीचा मृतदेह घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणी ही मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित होती.
उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे एका अधिकाऱ्याच्या पूर्व पत्नीचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणी ही मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित होती. प्राथमिक तपासामध्ये सदर तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर येत आहे. सदर सरकारी अधिकारी आणि तरुणीचा प्रेमविवाह झाला होता. दोघांच्याही वयामध्ये १५ वर्षांचं अंतर होतं. पुढे त्यांचा घटस्फोट झाला होता. मात्र घटस्फोटानंतही मागच्या काही महिन्यांपासून ते एकत्र राहत होते. त्याचदरम्यान ही घटना घडली आहे. मृत तरुणी ही मागच्या काही काळापासून डिप्रेशनशी झुंजत होती, अशी माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सिद्धार्थनगर येथील इटावा नगरपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या सरकारी अभियंता संदीप कुमार यांची पूर्व पत्नी अंशी सोनी हिचा मृतदेह घरात सापडला. दोघांचाही घटस्फोट झाल्यानंतरही अंशी ही मागच्या काही दिवसांपासून संदीप यांच्यासोबत राहत होती. नेहमीप्रमाणे काल संदीप कुमार हे सकाळी ऑफिसला जाऊन संध्याकाळी घरी परतले. दरम्यान, त्यांना खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना अंशी हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला.
संदीप कुमार आणि अंशी सोनी हे मुळचे रायबरेली जिल्ह्यातील होते. त्यांच्या वयामध्ये तब्बल १५ वर्षांचे अंतर होते. संदीप कुमार यांचा जन्म १९८२ मध्ये झाला होता. तर अंशी सोनी हिचा जन्म १९९७ मध्ये झाला होता. अंशी हिच्या कुटुंबीयांची परवानगी न घेता दोघांनीही २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. दोघेही काही वर्षे एकत्र राहिले. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अंशी ही मॉडेलिंगच्या क्षेत्राकडे वळली. तर संदीप हे सिद्धार्थनगरमधील विविध नगरपंचायतीमध्ये कार्यरत राहिले. सध्या ते इटावा नगरपंचायतीमध्ये सेवेत आहेत.
या घटनेबाबत संदीप यांनी सांगितले की, अंशी आणि माझा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. दरम्यान, अंशी ही काही काळापासून डिप्रेशनचा सामना करत होती. तणावापासून मुक्ती मिळावी म्हणून जून महिन्यात ती फिरायला आली होती. सर्व काही सुरळित चाललं होतं. दरम्यान, अचानक काय झालं ते समजलं नाही. दरम्यान, सुसाइड नोटमध्ये तिने डिप्रेशनचा उल्लेख केला आहे.