पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 12:10 PM2024-10-25T12:10:26+5:302024-10-25T12:10:51+5:30

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे पोलिसांचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. येथे लुटीच्या एका गुन्ह्यातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देऊन पोलीस चौकीमधून हातकड्यांसह फरार झाल्याची घटना समोर आली आहे.

Uttar Pradesh Crime News: The policemen were busy playing cricket, and sneaked out of the post with handcuffs | पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ

पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे पोलिसांचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. येथे लुटीच्या एका गुन्ह्यातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देऊन पोलीस चौकीमधून हातकड्यांसह फरार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा ठाण्यातील पोलीस कर्मचारी हे क्रिकेट खेळण्यात व्यक्त होते. आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाल्याचे समजताच पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. आता फरार चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. आता हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची तयारी वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उन्नावमधील एका बँक मित्राकडून ३ लाख रुपये लुटण्यात आले होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या ३ लुटारूंनी ही लूट केल्याचे समोर आले होते. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली आणि अश्विनी नावाच्या एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमधून मुश्ताक आणि लकी या दोन आरोपींची नावं समोर आली होती. काही दिवसांनंतर मुस्ताकलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र लकी नावाचा तिसरा आरोपी अद्यापही फरार होता.

दरम्यान, फतेहपूर चौरासी येथील उगू पोलीस चौकीच्या प्रभाऱ्यांकडे या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी होती. चौकी प्रभारी अजय शर्मा आणि त्यांच्या पथकाकडून फरार लकीचा शोध सुरू होता. अखेर बुधवारी पोलिसांनी लकी याला पकडले. मात्र त्याला पोलीस ठाण्यात आणण्याऐवजी उगू येथील पोलीस चौकीत नेण्यात आले. संध्याकाळी येथील चौकी प्रभारी कुठल्याही कामासाठी बाहेर गेले. यावेळी लकीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शिपाई विकास गंगवार आणि अतुल यादव यांच्याकडे देण्यात आली.

पोलीस शिपायांनी लकी याला हातकड्या घालून चौकीत बसवून ठेवले. तसेच ते तिथेच क्रिकेट खेळू लागले. यादरम्यान संधी साधून लकी हा हातकड्यांसह तिथून पसार झाला. काही वेळातच पोलील शिपायांना लकी फरार झाल्याचे कळले आणि त्यांच्या तोंडचंच पाणी पळालं. त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर ठाण्याच्या प्रमुखांनी घटनास्थळी धाव घेत चौकीचे प्रभारी आणि दोन्ही शिपायांना धारेवर धरले. त्यानंतर फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.  

Web Title: Uttar Pradesh Crime News: The policemen were busy playing cricket, and sneaked out of the post with handcuffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.