पेशंट गेलाय! तीन रुग्णालयांनी डेड घोषित केलं; ७ तास मृतदेह शवागारात अन् मग घडला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 02:56 PM2021-11-20T14:56:27+5:302021-11-20T14:57:00+5:30
अपघातग्रस्ताला तीन रुग्णालयांनी मृत घोषित केलं; शवविच्छेदनाआधी भलतंच घडलं
मुरादाबाद: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एक अजब घटना घडली आहे. रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पंचनाम्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पोहोचले. पोलिसांनी मृताच्या शरीरावरील जखमा पाहिल्या. त्यावेळी त्यांना मृताचा श्वास सुरू असल्याचं लक्षात आलं.
मृत व्यक्ती जिवंत असल्याचं समजताच शोकसागरात बुडालेल्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली. डॉक्टरांनी त्वरित व्यक्तीला तपासलं आणि त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्याआधी पहाटे साडे चार वाजता रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्तीला मृत घोषित केलं होतं. त्यानंतर व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता रुग्णालयातील शवागारात एकच खळबळ माजली. सात तास शवागारात ठेवण्यात आलेल्या व्यक्तीचा श्वास अचानक सुरू झाल्यानं रुग्णालय प्रशासन हादरलं. अचानक जिवंत झालेल्या व्यक्तीचं नाव श्रीकेश आहे. ते नगरपरिषदेचे कर्मचारी आहेत. रात्री उशिरा ते दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी रस्ता ओलांडताना त्यांचा अपघात झाला. याची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. श्रीकेश यांना घेऊन त्यांचे नातेवाईक तीन रुग्णालयात गेले. मात्र तिन्ही रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
तीन रुग्णालयांनी मृत घोषित केल्यानं श्रीकेश यांचे नातेवाईक मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयातल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये असलेल्या डॉ. मनोज यांनीही श्रीकेश यांना मृत घोषित केलं. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शवगारात पाठवण्यात आला. शुक्रवारी सकाळी पोलीस पंचनाम्याची तयारी करत होते. तेव्हा त्यांना मृत व्यक्तीचा श्वास सुरू असल्याचं लक्षात आलं. त्यांनी याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांना दिली. त्यानंतर डॉक्टरांनी श्रीकेश यांना तपासलं. त्यावेळी ते जिवंत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.