उत्तर प्रदेशातील पराभवाचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:06 AM2018-06-03T01:06:42+5:302018-06-03T01:06:42+5:30
उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा व नुरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्या पक्षाच्या दोन आमदारांनी त्याचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडले आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा व नुरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्या पक्षाच्या दोन आमदारांनी त्याचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडले आहे. भ्रष्टाचार थांबवण्यात राज्य सरकारला अपयश आले असून, अकार्यक्षम मंत्र्यांना आता तरी हाकलणे, हाच त्यावरील मार्ग आहे, असे या आमदारांनी म्हटले आहे.
गोपामाईचे आमदार श्याम प्रकाश यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून या पराभवाबद्दल थेट योगी आदित्यनाथ तसेच रा. स्व. संघ व भाजपाचे नेते यांनाच जबाबदार धरले आहे. त्यांनी लिहिले आहे की, आधी गोरखपूर व फुलपूर आणि आता कैराना आणि नूरपूर... या पराभवाचे आम्हाला दु:ख आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावाने भाजपाला राज्यात सत्ता मिळाली. पण सरकारची सारी सूत्रे मात्र संघ व संघटना यांच्या हातात असल्याने मुख्यमंत्रीही असहाय्य आहेत.
एका वृत्तपत्राशी बोलतानाही श्याम प्रकाश म्हणाले की ही केवळ माझी नव्हे, तर बहुतांशी भाजपा आमदारांची भावना आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाही. भ्रष्टाचार प्रचंड असून, त्यामुळे लोक नाराज आहेत. मुख्यमंत्री मोकळेपणाने फिरू शकत नाहीत, मनासारखे काम करू शकत नाहीत. अशी स्थिती कायम राहिल्यास भाजपाचे भवितव्य अंधकारमय असेल.
दुष्ट शक्तींचा विजय?
योगी आदित्यनाथ यांनी मात्र हा विजय दुष्ट शक्तींचा आहे. भ्रष्टाचार करून पैसा जमा केलेल्या मंडळींनी वाईट पद्धत अवलंबली आणि त्याचा विजय झाला. अर्थात, अशा पराभवाने आपण खचून जाणार नाही. या प्रकारे त्यांना सतत जिंकता येणार नाही, असे म्हटले आहे.
आपल्याला घरचा रस्ता जनताच दाखवेल
बलिया जिल्ह्यातील आमदार सुरेंद्र सिंह यांनीही राज्य सरकारच्या एकूणच कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की आता तरी अकार्यक्षम मंत्र्यांना दूर करायला हवे. त्यांना दूर न केल्यास पुढील निवडणुकामध्ये राज्यातील जनताच भाजपाला घरचा रस्ता दाखवेल. भाजपा नेत्यांनी आता तरी याचा विचार करायला हवा.