UP Minister Dharampal Singh: 'गोमूत्रामुळे भूतबाधा आणि वास्तुदोष दूर होतो', भाजप नेत्याचे अजब वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 10:01 AM2022-04-17T10:01:45+5:302022-04-17T10:05:44+5:30
UP Minister Dharampal Singh: उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री धरमपाल सिंह गोमूत्रावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
मेरठ:उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री धरमपाल सिंह (Minister Dharampal Singh) सध्या चर्चेत आले आहेत. मेरठमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना धरमपाल यांनी गोमुत्राचे फायदे सांगतल्यामुळे चर्चेत आले आहेत. "गोमूत्र शिंपडल्याने भूतबाधा आणि वास्तुदोष यांसारख्या समस्या दूर होतात", असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
शेण आणि गोमुत्राचे असेही फायदे...
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना धरमपाल सिंह म्हणतात की, ''गायीमध्ये पाच पदार्थ असतात. गाईचे दूध, गाईचे दही, गाईचे तूप, गाईचे शेण आणि गोमूत्र. गाईच्या शेणात लक्ष्मीचा वास असतो आणि गंगामैया गोमूत्रात वास करते. गोमूत्र शिंपडल्यास भूतबाधा किंवा वास्तुदोष यांसारख्या सर्व समस्या दूर होतात."
गाईच्या शेणातून सीएनजी उत्पादन
धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, "राज्यभरात रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात चारा बँक स्थापन करण्याची योजना आहे. गाईंचे शेण विकून सीएनजीचे उत्पादन करण्याची योजना आहे. यामुळे अनेक सीएनजी कंपन्या येतील, पैसाही मिळेल. दूध देणाऱ्या गाईंचे पालनपोषण केलेच जाते, पण यामुळे दूध न देणाऱ्या गाईंचेही पालनपोषण केले जाईल."