Uttar Pradesh Election 2022: अमित शाहांचं चॅलेंज अखिलेश यादव यांनी स्वीकारलं; म्हणाले, जागा अन् वेळ सांगा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 04:48 PM2022-01-30T16:48:27+5:302022-01-30T16:48:50+5:30
भाजपाला लाज वाटायला हवी त्यांच्यामुळे ७०० शेतकऱ्यांनी जीव गमावला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? असा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला होता. त्यावर अमित शाहांनी समाजवादी पक्षाला चॅलेंज दिलं होतं.
लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सध्या भाजपा-सपा नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध पेटलं आहे. याठिकाणी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खुलं आव्हान दिलं आहे. कायदा-सुव्यवस्था यावरुन सपा-भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात शाह यांनी कायदा सुव्यवस्थेवर अखिलेश यादव यांना खुल्या चर्चेचं निमंत्रण दिलं होते. त्यावर अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अखिलेश यादव यांनी ट्विट करुन म्हटलंय की, आम्ही प्रत्येक चॅलेंजला आता तयार आहोत. खऱ्याला तयारीची गरज भासत नाही. तुम्ही केवळ जागा अन् वेळ सांगा असं ते म्हणालेत. शाह यांच्या आव्हानावर अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, माझ्यासोबत भाजपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जेव्हा हवं तेव्हा चर्चा करावी. कृषी कायदे का आणले होते? आणि हे कायदे शेतकऱ्यांच्या अधिकारात का नव्हते? हे भाजपाला सांगायला हवं असंही त्यांनी सांगितले.
तसेच भाजपाला लाज वाटायला हवी त्यांच्यामुळे ७०० शेतकऱ्यांनी जीव गमावला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? असा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला होता. त्यावर अमित शाह यांनीही अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. शाह म्हणाले की, अखिलेश बाबूला लाजही वाटत नाही. कायदा सुव्यवस्था ठीक नाही असा आरोप त्यांनी लावला. आज मी सार्वजनिक कार्यक्रमात आकडेवारी घेऊन आलोय. हिंमत असेल तर तुम्हीही आकडे घेऊन पत्रकार परिषद द्या असं चॅलेंज दिले.
हम हर चैलेंज के लिए अभी तैयार हैं… सच को तैयारी की ज़रूरत नहीं पड़ती… वो जगह बताएं, समय बताएं!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 30, 2022
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रणांगणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात माफियांनी उत्तर प्रदेश सोडलं किंवा जेलमध्ये गेले. आता यातील काहींना अखिलेश यादव यांनी त्यांच्या उमेदवार यादीत स्थान दिलं आहे. उत्तर प्रदेशात जर सपा आणि बसपाचं सरकार आलं तर पुन्हा एकदा माफिया राज येईल. जर तुम्ही भाजपाला मत दिलं तर आम्ही उत्तर प्रदेशला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवू असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं आहे. मुझफ्फरनगर आणि पश्चिम उत्तर प्रदेशची जनता दंगलींना विसरली आहे का? असा सवालही त्यांनी केला.