Uttar Pradesh Election 2022 : योगींविरोधात अखिलेश यांची 'मंडल'नीती; ओबीसींसह विविध जात समूहांची बांधली मोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:49 AM2022-02-23T11:49:48+5:302022-02-23T11:50:43+5:30
Uttar Pradesh Election 2022 : काका शिवपाल यादव यांची नाराजी दूर करण्यातही अखिलेश यांना यश आले. शिवपाल यादव यांना जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये मान आहे.
योगेश बिडवई
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेसाठी आज चौथ्या टप्प्याचे मतदान होत असताना निवडणुकीची रंगत वाढली आहे. केंद्र व राज्यात सरकार असल्याने भाजपकडे मोठी यंत्रणा आहे. मात्र सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी वेगवेगळ्या जात समूहांची मोट बांधल्याने योगी यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
सपा म्हणजे यादव व मुस्लिमांचा पक्ष या प्रतिमेतून पक्षाला मुक्त करण्यात त्यांनी यश मिळविल्याचे चित्र आहे. सुमारे ५० टक्के मते असलेला व निवडणुकीत निर्णायक ठरणारा ओबीसी समाज त्यांनी छोट्या पक्षांशी आघाडी करून जोडला आहे. राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांना सोबत घेऊन अखिलेश यांनी पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकरी समूह असलेला जाट समाज जोडला आहे. सोबतच गुर्जर समाजाचीही साथ त्यांना लाभू शकते. जाट आणि गुर्जर समाजाचा गावगाड्यातही मोठा दबदबा आहे. लोक दलाला त्यांनी ३३ जागा सोडल्या आहेत. भाजपचे माजी मंत्री व ओबीसी नेते स्वामीप्रसाद मौर्य समाजवादी पक्षात आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.
मध्य उत्तर प्रदेशात महान दलाचे केशवदेव मौर्य यांना सोबत घेऊन मौर्य आणि कुशवाह समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला. बदाऊ ते जालान पट्ट्यात या समाजाची मोठी मते आहेत. अवध प्रांतात मात्र भाजप आणि सपामध्ये थेट सामना आहे. पूर्व उत्तर प्रदेशात सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे ओम प्रकाश राजभर यांच्याशी युती केली आहे. राजभर हे 'अति पिछडे' समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात.
काकांची नाराजी दूर करण्यात यश
काका शिवपाल यादव यांची नाराजी दूर करण्यातही अखिलेश यांना यश आले. शिवपाल यादव यांना जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये मान आहे.
वन मॅन आर्मी
अखिलेश हे वन मॅन आर्मी म्हणून काम करत आहेत. त्यांनी सोशल मीडियाची चांगली टीम बांधली आहे. त्यांचे आतापर्यंत १५० रॅली आणि ५० रोड शो झाले आहेत. लखनौतील ऑफिसमध्ये पक्षाचा वॉर रूम आहे.