Uttar Pradesh Election 2022: अबब! निवडणुकीत पैशांचा पाऊस; कोट्यवधींची रोकड सापडली, मोजायला मशीन मागवली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 05:51 PM2022-02-05T17:51:20+5:302022-02-05T17:52:19+5:30
पोलिसांनी सर्वात आधी कानपूरच्या काकादेव परिसरातील सीएमएस कंपनीच्या गाडीतून ५ कोटींहून अधिक रक्कम ताब्यात घेतली.
कानपूर – उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत रणधुमाळीत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कानपूर येथे काकादेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेकपोस्टवेळी एका व्हॅनमध्ये ५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर स्वरुप नगर परिसरातून १ कोटींहून जास्त पैसे ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून इन्कम टॅक्स विभागाचं पथकही घटनास्थळी पोहचलं असून हे पैसे कुणाचे आहेत त्याचा शोध घेतला जात आहे.
कानपूर येथे ३ ठिकाणी जप्त करण्यात आली रोकड
पोलिसांनी सर्वात आधी कानपूरच्या काकादेव परिसरातील सीएमएस कंपनीच्या गाडीतून ५ कोटींहून अधिक रक्कम ताब्यात घेतली. कंपनीच्या मते, ही कॅश वीज कंपनी केस्कोशी कनेक्शन आहे. जी बँकेत घेऊन चालले होते. परंतु पोलिसांनी या रक्कमेबाबत कुठलेही कागदपत्रे सादर केली नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी घटनास्थळी हे सगळे पैसे ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला. त्यानंतर स्वरुप नगर परिसरात कंपनीच्या गाडीत विना कागदपत्रे १ कोटी ७४ हजारांची रक्कम जप्त करण्यात आली. त्यात सिक्युरिटी वाहनाचे ४ कर्मचारी होते.
या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता ही रक्कम एटीएमसाठी घेऊन जात असल्याचं सांगितले. परंतु त्यांच्याकडेही कागदपत्रे आढळली नाहीत. तर एका खासगी वाहनातून ६ लाखांची रोकड पकडली आहे. रोख रक्कम घेऊन जाणाऱ्यांकडे कुठलेही कागदपत्रे सापडली नाहीत. सिक्युरिटी कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहचले परंतु ते कॅमेऱ्यासमोर काहीही बोलले नाही. पण हे पैसे अधिकृत आहेत. आम्ही कागदपत्रे पोलिसांना दाखवू असं त्यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणावर डीसीपी मूर्ती म्हणाले की, शहरातील ३ वेगवेगळ्या ठिकाणी ७ कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली आहे. घटनास्थळी कागदपत्रे न मिळाल्याने ही रक्कम जप्त केली. आम्ही याबाबत आयकर विभागाला सूचना दिली आहे. त्यानंतर आयकर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचून पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीला रंगत आली असून या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडतोय की काय? अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे.