Uttar Pradesh Election 2022: मते फोडण्यासाठी भाजपची ‘यादव’ रणनीती; मोदी-योगींच्या तोंडी एकच नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:43 PM2022-02-15T12:43:24+5:302022-02-15T12:43:52+5:30
इटावा, मैनपुरी, फिरोजाबाद, कासगंज, औरेय्या अन् एटा या सहा जिल्ह्यात गेली दोन ते अडीच दशके मुलायमासिंहांना घवघवीत यश मिळाले.
सचिन जवळकोटे
करहल : योगी अन् मोदी यांच्या तोंडी सध्या एकच नाव. ते म्हणजे यादव परिवार. उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्यात यादव समाज लाखोंच्या घरात. त्यामुळे हा ‘यादव बेल्ट’ डळमळीत करण्यासाठी भाजपने आखलीय 'यादवी' घडवण्याची रणनीती.
इटावा, मैनपुरी, फिरोजाबाद, कासगंज, औरेय्या अन् एटा या सहा जिल्ह्यात गेली दोन ते अडीच दशके मुलायमासिंहांना घवघवीत यश मिळाले. मात्र २०१७ निवडणुकीत पिता-पुत्राच्या वादात यादव विभागले गेले. त्याचा फायदा भाजपलाच झाला. मात्र यंदा पिता-पुत्रासोबतच 'चाचा-भतिजा'ही एक झालेत. जसवंतनगरचे आमदार काका शिवपाल सिंहही आता अखिलेश यांच्यासोबत आहेत. केंद्रीय कायदा राज्यमंत्री एसपीसिंह बघेल यांना अखिलेशच्या विरोधात उतरवले आहे. ते एकेकाळी मुलायमसिंह यांचे स्वीय सुरक्षा अधिकारी होते. सपाचे खासदारही होते. शाक्य, बघेल आणि इतर मागासवर्गीय समाजाचा बघेल यांना फायदा होईल, असा भाजप नेत्यांना अंदाज आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारच दिलेला नाही.
अखिलेश यांच्या वहिनी अपर्णा यादव यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मुलायमसिंह यांच्या घराण्यात फाटाफूट घडविण्याचा अर्थात यादवी माजवण्याचा प्रयत्न योगी आदित्यनाथांनी केला आहे. ‘अपर्णा यांच्यामागे किती कार्यकर्ते असतील ?’ या प्रश्नावर रोहनसिंह यादव नामक कार्यकर्ता उत्तरला, 'बात सिर्फ ताकत की नही, लोगो मे संभ्रम फैलाने की है.'
...लेकिन आखीर यादवही है
अखिलेश यांच्या करहल मतदारसंघात सर्वाधिक संख्या यादवांची असली तरीही दोन गोत्रांमध्ये हा समाज विभागला आहे. अखिलेश कमरिया यादव आहेत. मात्र इथे घोसी यादव सर्वाधिक. त्यामुळे भाजपने घोसींवरही अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मात्र एक कार्यकर्ता स्वरूपसिंह यादव म्हणतात, 'नेताजी का बेटा कोई भी हो, लेकिन आखीर यादवही है.'