Uttar Pradesh Election 2022 : केंद्राची विकासकामे योगींना ठरणार फायद्याची
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 09:21 AM2022-02-22T09:21:55+5:302022-02-22T09:22:13+5:30
घरांसाठी अडीच लाखांचे अनुदान : प्रधानमंत्री आवास योजना गरिबांना ठरली लाभदायक
सिंगाही भेडैरा (लखीमपूर खिरी) : ‘दादा, पिछली सात पिढीओं में घर के उपर की छत हम बदल नहीं पाये थे. लेकीन प्रधानमंत्री आवास योजना कें कारण हमारा आज खुद का पक्का मकान है...’ सिंगाही भेडैरा गावातील जोगिंदकुमार साक्य सांगत होते. जोगिंदकुमार यांच्यासारख्या अनेकांना आंबेडकरनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळालेल्या अनुदानामुळे पक्की घरे बांधता आली आहेत.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या या योजनेचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मतांचा जोगवा मागताना उपयोग होत आहे. नगरपंचायतीचे गाव असलेल्या सिंगाही भेडैरामध्ये सुमारे १००० कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून अडीच लाखांचे अनुदान मिळाले आहे. यातून लोकांनी पक्की घरे बांधली आहेत. वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळतो, असे १५ वर्षांपासून अपक्ष नगरसेवक असलेल्या जोगिंदकुमार यांनी सांगितले.
वर्षानुवर्षे गरिबीत असलेल्या कष्टकरी दलितांना या योजनेचा चांगला फायदा मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात फिरताना छोट्या गावात दलित वस्तीत रस्त्यांच्या कडेला पक्की घरे बांधलेली दिसतात. त्यावर प्रधानमंत्री आवास योजना लिहिलेले दिसते. काहींनी सरकारच्या अनुदानात आणखी रक्कम टाकून मोठी घरे बांधली आहेत.
मला घरासाठी अडीच लाखांचे अनुदान मिळाले आहे. माझ्या नातेवाइकांनाही या योजनेचा फायदा आहे.
नसरुद्दीन रुसल अहमद, रहिवासी, सिंगाही भेडैरा (लखीमपूर खिरी)
मला प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळाले आहे. माझ्या गावातील शेतमजूर महिलांनाही घराचे अनुदान मिळाले आहे.
नीता लोध, शेतमजूर, बहादूरपूर (सीतापूर)