Uttar Pradesh Election 2022 : हरदोईत षटकार मारणारा पक्ष बसतो सत्तेच्या गादीवर
By गौरीशंकर घाळे | Published: February 22, 2022 09:07 AM2022-02-22T09:07:36+5:302022-02-22T09:08:09+5:30
Uttar Pradesh Election 2022 : राजभर यांच्यामुळे समाजवादीही तुल्यबळ
गौरीशंकर घाळे
हरदोई : हरदोई जिल्ह्यात षटकार ठोकणारा पक्ष उत्तर प्रदेशच्या गादीवर बसतो म्हणतात. राजकारणाच्या बदलत्या समीकरणांत इतके छातीठोक विधान धाडसाचे असले तरी दिशानिदर्शक मानायला वाव आहे. नकाशावर राजधानी लखनऊ आणि उद्योगनगरी कानपूरला लागून असलेला हा जिल्हा. तरीही आर्थिक स्थिती बेताचीच. आकाराने राज्यातील तिसरा मोठा जिल्हा, इतकीच काय ती जमेची बाजू. जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा आहेत. त्यापैकी सहा किंवा जास्त जागा जिंकणारा पक्ष सत्तेत बसतो, अशी आख्यायिका आहे.
हरदोईतील सात जागांवरचे कमळ फुललेले ठेवण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींच्या प्रचार सभांनी रंगत आणली आहे. तर, दुसरीकडे सपाचे अखिलेश यादव आणि ओमप्रकाश राजभर यांची संयुक्त सभा झाली.
आपल्या भोजपुरी भाषणात राजभर यांनी भाजप आणि बसपावर चांगलाचा हल्लाबोल केला. राजभर यांच्या पक्षाचे नाव सुहलदेव भारतीय समाज पार्टी. सुभासपा के ओपी राजभर हा इथला त्यांचा शाॅर्टफाॅर्म प्रचलित आहे. ओपी राजभर यांचा पिवळा आणि सपाचा लाल झेंडा एकत्र आल्याने हरदोईचा किल्ला भाजपसाठी काहीसा अवघड बनला आहे. त्यामुळे भाजपनेही जोरदार आघाडी उघडली आहे.
उत्तर प्रदेश आणि इथली जातीय समीकरणे सर्वश्रुत आहेत. हरदोईतही त्याचा प्रभाव आहेच. जातसमूहानुसार बदलणारी राजकीय आवडनिवड इथेही प्रकर्षाने जाणविल्याशिवाय राहत नाही. बेरोजगारी, मोकाट जनावरे आणि वाहतूक कोंडी या तीन मुद्दयांची चर्चा मात्र जोरात असते.
काय आहे परिस्थिती?
हरदोईत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मोकाट जनावरांमुळे त्रस्त आहेत. शेतजमिनीचा छोटा तुकडाही कुंपणाने बंदिस्त करणे परवडणारे नाही. मोकाट जनावरांनी त्रस्त केले असले तरी उसाला चांगला भाव मिळाल्याने हा वर्ग खुश आहे. तर महिन्यातून दोनदा मिळणारे राशन आणि पेन्शनची तुटपुंजी वाटणारी रक्कमही भाजपसाठी लाभार्थी नावाचा एकगठ्ठा मतदार तयार करणारी बनली आहे.