Uttar Pradesh Election 2022: भाजपावगळता अन्य पक्षाच्या उमेदवारांना गावात नो एन्ट्री; कारण ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 07:03 PM2022-01-25T19:03:58+5:302022-01-25T19:04:50+5:30
योगी सरकारने मागील ५ वर्षात चांगले विकास काम, आरोग्य सुविधा आणि गरिबांना रेशन देण्याचं काम केले आहे
हापूड – उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हापूडमधील एका गावाची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. हापूडच्या लाखन गावात एका पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. धौलाना विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या गावातील लोकांनी सार्वजनिक पोस्टर लावत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थनार्थ जाहीर आवाहन केले आहे. या गावातील लोकांनी जो मजकूर बॅनरवर लिहिला आहे तो पाहता इतर उमेदवारांची बोलतीच बंद झाली आहे.
सोशल मीडियावर या गावच्या बॅनरचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात म्हटलंय की, आमचं गाव लाखन योगी आदित्यनाथ यांच्यासोबत आहे. याठिकाणी भाजपा वगळता इतर कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराने येऊन वेळ वाया घालवू नका. अशा आशयाचे पोस्टर्स गावात सगळीकडे लागले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील हे गाव चांगलेच व्हायरल झालं आहे. तसेच आसपासच्या गावातही लाखन गावाची चर्चा रंगली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, योगी सरकारने मागील ५ वर्षात चांगले विकास काम, आरोग्य सुविधा आणि गरिबांना रेशन देण्याचं काम केले आहे. त्यासाठी पुन्हा एकदा राज्यात योगी सरकार आणि धौलाना विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार निवडून येण्यासाठी आम्ही समर्थन दिले आहे. ग्रामपंचायतीलील सर्व मान्यवरांनी गावकऱ्यांसोबत मिळून सहमतीनं या आशयाचे पोस्टर्स गावात लावले आहेत.
तसेच योगी सरकार असतानाही धौलाना विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार नव्हता. ज्यामुळे या भागातील विकास कामांवर त्याचा परिणाम झाला. याठिकाणी गेली ५ वर्ष बहुजन समाजवादी पक्षाचे असलम चौधरी हे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र विजयानंतर त्यांनी कधीही गावाकडे तोंड दाखवलं नाही. आता याठिकाणची जनता परिवर्तन करण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे यंदा भाजपा उमेदवाराला आमदार बनवण्यासाठी गावकऱ्यांनी चंग बांधला आहे. ज्यामुळे मतदारसंघाचा विकास होईल अशी आशा येथील गावकऱ्यांना आहे.
गावात २६०० मतदार
लाखन गावात जवळपास ३ हजारांच्या आसपास लोकसंख्या आहेत. परंतु यातील २६०० मतदार मतदान करतात. जेव्हापासून गावात बॅनर लावला आहे तेव्हापासून भाजपासोडून इतर कुठलाही उमेदवार फिरकला नाही. धौलाना विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलम चौधरी आजपर्यंत गावात आले नाहीत. ज्यामुळे गावचा विकास झाला नाही. त्यामुळे राज्यातील योगी सरकारच्या समर्थनासाठी हे पोस्टर्स लावल्याचं गावकरी भूरे यांनी सांगितले.