Uttar Pradesh Election 2022: नोट मुंबई मां...वोट डालो यूपी मां! आपल्या माणसाला मत देण्यासाठी झुंडी निघाल्या गावाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 08:31 AM2022-02-17T08:31:30+5:302022-02-17T08:31:54+5:30
यंदा उमेदवाराच्या गावची मंडळी आमदारकीच्या मतदानाला आवर्जून हजेरी लावताना जाणवू लागलंय.
कनौज : उत्तर प्रदेशातला सर्वात मोठा सण होळीचा. पोटापाण्यासाठी देशभर विखुरलेले स्थलांतरित यावेळी काहीही करुन आपल्या गावी पोहचतातच. मात्र यंदा मतदानासाठीही अनेक रोजंदार दिल्ली-मुंबईहून घरी परतू लागलेत. एक वेळ दिवाळीला येणार नाहीत, मात्र होळीला इथला माणूस घरी येणार म्हणजे येणारच. यंदा होळी १९ मार्चला. अजून महिनाभराचा अवकाश. मात्र लखनऊ-कानपूरकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसू लागलीय.
तिकीट जनरल डब्यातलं, मात्र एसीच्या टॉयलेटजवळ बॅगा टाकून निवांत पसरलेल्या रामबबुवाला विचारलं, ‘इस बार इतनी जल्दी होली ?’ त्यानं सांगितलं, ‘नही भैय्या, इलेक्शन का प्रचार मा निकले. हमरे गाव के विधायक है ना खडे,’ परंतु इलेक्शन कार्ड कुठलं, या प्रश्नावर तो गप्पच. मात्र त्याची पत्नी उत्साहाच्या भरात बोलून गेली, ‘दोनो तरफ है ना.’ खरं तर लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीत यांना इंटरेस्ट नसतो. सरपंच निवडीवेळी मात्र येण्या-जाण्याच्या खर्चासह ८ दिवसांचा पगारही त्यांना उमेदवार देतात. हा खर्च ॲडव्हान्समध्ये मुंबईत त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो. यंदा उमेदवाराच्या गावची मंडळी आमदारकीच्या मतदानाला आवर्जून हजेरी लावताना जाणवू लागलंय.
मोदींच्या निशाण्यावर काँग्रेस नव्हे... मजूर होते!
लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र काँग्रेसनं मजुरांना रेल्वेतून पाठवून दिल्यानंच कोरोना देशभर पसरला, असा आरोप पंतप्रधान मोदींनी लोकसभेत केला होता. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर या विरोधात संताप व्यक्त केला. मात्र मोदींचा रोख काँग्रेसवर नव्हताच. दोन वर्षांपूर्वीच्या त्या दुःखद घटनेची आठवण करून दिल्यामुळे या मजुरांच्या जुन्या जखमांची खपली पुन्हा निघालीय. याचे प्रतिबिंब त्यांच्या मतदानात नक्की पडलेले दिसणार आहे.