Uttar Pradesh Election 2022 : उत्तर प्रदेशात चर्चा महाराष्ट्राची; खाते उघडण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 12:44 PM2022-02-26T12:44:41+5:302022-02-26T12:45:13+5:30
Uttar Pradesh Election 2022 : महाराष्ट्रातील मतदारांवर शिवसेनाच नव्हे, तर अन्य पक्षांचाही डोळा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांविरुद्ध.
रमाकांत पाटील
डूमरियागंज : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेनेही किमान आपले अस्तित्व निर्माण व्हावे, यासाठी कंबर कसली असून, युवा नेते व महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर येथे शिवसेना कार्यकर्त्यांना आस लागून आहे. विशेष म्हणजे या भागातील सुमारे ५० हजारांहून अधिक मतदार व त्यांचे नातेवाईक महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याने केवळ शिवसेनाच नव्हे तर, इतर पक्षांचाही डोळा या मतदारांवर आहे.
शिवसेनेने एकूण ५९ उमेदवार दिले होते. मात्र त्यापैकी २२ उमेदवारांनी माघार घेतली, तर ३७ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. शिवसेना नेत्यांना किमान दोन उमेदवार निश्चित विजयी होतील, असा आशावाद आहे. डूमरियागंजचे उमेदवार राजू श्रीवास्तव व कोरोवाचे उमेदवार आरती कौल यांच्या विजयासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यासाठी युवा सेनेचे प्रमुख व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांची दोन्ही ठिकाणी सभा झाली असून, या दोन्ही सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आदित्य ठाकरे यांनीही उत्तर प्रदेशात नसून महाराष्ट्रातच असल्याची भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
या ठिकाणी महाराष्ट्राचे दुसरे मंत्री अब्दुल सत्तार यांचीही सभा होणार आहे. डूमरियागंजमध्ये ५० हजार कुटुंबे महाराष्ट्रात असल्याचे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सांगतात. येथील शिवसेनेचे उमेदवार राजू श्रीवास्तव हे बसपा सरकारमध्ये राज्यमंत्री होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने उमेदवारी नाकारल्याने ते आता शिवसेनेकडून उमेदवारी करीत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या मित्रसंघ या संस्थेचे विस्तारलेले जाळे व महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले मतदार यावर त्यांची मदार आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांविरुद्ध
अर्थात महाराष्ट्रात सत्तेत असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष या ठिकाणी मात्र एकमेकांच्याविरोधात आहेत. येथे काँग्रेसने उमेदवार दिला आहे, तर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे समाजवादी पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार होते. मात्र सध्या ते अटकेत असल्याने येऊ शकले नाहीत, असे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या उत्तर प्रदेशातील मतदारांवर शिवसेनेसह काँग्रेस, सपा आणि भाजपचाही डोळा आहे.