'योगी को PM बनाएंगे!', गोरखनाथ मंदिराबाहेर घोषणाबाजी; एका झटक्यात आदित्यनाथ राष्ट्रीय पटलावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:24 PM2022-03-10T13:24:32+5:302022-03-10T13:25:06+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा मोठ्या विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना दिसत आहे. प्राथमिक कल पाहता भाजपानं बहुमताचा आकडा गाठला आहे.
गोरखपूर-
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा मोठ्या विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना दिसत आहे. प्राथमिक कल पाहता भाजपानं बहुमताचा आकडा गाठला आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा आता एका झटक्यात राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर पोहोचली आहे. यूपीत आता योगी देशाचे भावी पंतप्रधान असल्याच्याही घोषणा देण्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाच्या शानदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर गोरखनाथ मंदिराच्या बाहेर जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. भाजपाचे कार्यकर्ते पुष्पवृष्टीच्या माध्यमातून आपला आनंद साजरा करत आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदार संघातून आघाडीवर आहेत. तसंच त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे. गोरखनाथ मंदिराच्या बाहेर जमलेले भाजपाचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. यूपीत पुन्हा एकदा बुलडोझर चालणार, अशा घोषणा भाजपाकडून दिल्या जात आहेत. तसंच 'योगी को PM बनाएंगे', अशीही घोषणाबाजी भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीआधी भाजपाचं केंद्रीय नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे जर राज्यात भाजपाची कामगिरी निराशाजनक झाली तर योगी आदित्यनाथ यांना मोठा फटका बसणार असं सांगितलं गेलं होतं. पण एका झटक्यात संपूर्ण चित्र आता बदललं आहे.
भाजपात योगींना मिळणार मोठा पाठिंबा!
राजकीय जाणकारांच्या मतानुसार यूपीतील विजयानंतर योगी आदित्यनाथ यांना पक्षात मोठा पाठिंबा मिळणार आहे. आतापर्यंत योगी आदित्यनाथ यांना भाजपाच्या कॅडरमध्ये पाचव्या क्रमांकांचं स्थान असलेला नेता असं म्हटलं जात होतं. पण या विजयानंतर योगी आदित्यनाथ आता पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनतील असं म्हटलं जात आहे.
‘गुंडगिरीचा पराभव’
जनता जिंकत असून गुंडगिरीचा पराभव होत असल्याचं विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलं आहे. भाजपा नेते बृजेश पाठक यांनीही पक्षाच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. "यूपीच्या जनतेने समाजवादी पक्षाला स्पष्टपणे नाकारलं आहे", असं पाठक म्हणाले.