गो-तस्करी करणारी ट्रक घुसला घरात, 6 जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 05:50 PM2019-01-01T17:50:21+5:302019-01-01T17:56:25+5:30
नवीन वर्षाच्या पहाटेच उत्तर प्रदेशातील चंदौलीतील एका परिवारावर काळानं घाला घातला आहे. जिल्ह्यातील इलिया पोलीस ठाणे परिसरात येणाऱ्या मालदह गावामध्ये रस्त्याशेजारी असलेल्या झोपडीमध्ये एक मिनी ट्रक घुसला आणि भीषण दुर्घटना घडली.
लखनौ - नवीन वर्षाच्या पहाटेच उत्तर प्रदेशातील चंदौलीतील एका परिवारावर काळानं घाला घातला आहे. जिल्ह्यातील इलिया पोलीस ठाणे परिसरात येणाऱ्या मालदह गावामध्ये रस्त्याशेजारी असलेल्या झोपडीमध्ये एक मिनी ट्रक घुसला आणि भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये आणखी दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
(गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य)
मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमधून अवैधरित्या जनावरांची तस्करी केली जात होती. जनावरं घेऊन जाणारा ट्रक बिहारच्या दिशेनं प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस या ट्रकचा पाठलाग करत होते. पोलिसांच्या भीतीपोटी चालक ट्रक भरधाव चालवत होता. यादरम्यान, चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याशेजारी असलेल्या झोपडीमध्ये ट्रक घुसला आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
(कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली १५ जनावरे जप्त)
साखरझोपेत असतानाच या सहा जणांवर काळानं घाला घातला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेविरोधात स्थानिकांनी तीव्र संपात व्यक्त करत रास्तारोको आंदोलन केले. शिवाय, पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊ दिले नाहीत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी डीएम आणि एसपींनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, स्थानिकांनी पोलिसांवर निष्काळजीपणा आरोप केला आहे. याप्रकरणी सहाहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.