कौतुकास्पद! परदेशातील नोकरीची ऑफर धुडकावली; आता शेतीतून ‘अशी’ करतोय लाखोंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 05:14 PM2022-10-29T17:14:33+5:302022-10-29T17:16:07+5:30
गणित विषयात पदवी घेतल्यानंतर रवींद्र यांनी परदेशी कंपन्यातील नोकऱ्यांची ऑफर नाकारली व कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग निवडला.
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील सिराथू तालुक्यात एका शेतकऱ्याने परदेशातील नोकरीची ऑफर धुडकावली आहे. शेतीसाठी त्याने असं केलं आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती करून आता लाखो रुपयांचा नफा कमावत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिराथू तालुक्यातील तरुण शेतकरी रवींद्र पांडेय यांनी कॅक्टस प्रजातीतील ड्रॅगन फ्रूटची शेती करत नफा कसा कमावता येतो हे सिद्ध करून दाखवलं आहे. 62 हजार रुपयांचा खर्च करत पांडेय वर्षाकाठी 4 लाख रुपये कमावत आहेत.
गणित विषयात पदवी घेतल्यानंतर रवींद्र यांनी परदेशी कंपन्यातील नोकऱ्यांची ऑफर नाकारली व कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग निवडला. सध्या ते बेरोजगार युवकांसाठी आदर्श ठरले आहेत. रवींद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे बीएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. 7 वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी अखंड प्रताप सिंह यांची भेट झाली. त्यांनी कॅक्टस प्रजातीच्या ड्रॅगन फ्रूटची शेतीसंदर्भात माहिती दिली.
पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरूवातीला शेतात ड्रॅगन फ्रूटची छोटीशी नर्सरी तयार केली. यातून चांगला नफा होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सातत्याने ड्रॅगन फ्रूटची शेती कायम ठेवली. सद्यस्थितीत ड्रॅगन फ्रूटची रोपं विकून रवींद्र वर्षाकाठी 4 लाख रुपये कमावत आहेत. ते आता प्रगतीशील शेतकरी झाले आहेत. रवींद्र पांडेय यांनी त्यांचे वडिल सुरेशचंद्र यांच्या मदतीने सुरूवातीला 62 हजार रुपये खर्च केले व 400 रोपं लावली.
पहिल्या टप्प्यात 2 वर्ष त्यांनी रासायनिक खताचा वापर केल्यानं झाडांना अपेक्षित मोठं फळ लागलं नाही. गुंतवणूक करूनही यश न आल्यानं ते निराश झाले. पण त्यांनी हा विषय तिथचं सोडून देण्याऐवजी इंटरनेटवर जाऊन परदेशातील ड्रॅगन फ्रूटची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला. परदेशी तज्ज्ञांनी रासायनिक खताचा वापर बंद करून सेंद्रीय खत वापरण्याचा सल्ला दिला. हा प्रयोग करून पाहिल्यानंतर त्यांना अपेक्षेपेक्षा चांगला परिणाम पाहायला मिळाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.