दूध देणं बंद झाल्यानंतर गायीला सोडलं तर शेतकऱ्यावर दाखल होणार गुन्हा; योगी सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 09:10 PM2022-05-30T21:10:30+5:302022-05-30T21:12:06+5:30
Uttar pradesh: "कसाई आणि शेतकरी यांत फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ कसायांची नाही. आपली जनावरे निराधार सोडणाऱ्यांविरोधात प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.”
बेवारस जणावरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आज योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दूध देणे बंद झाल्यानंतर, गायींना बेवारस सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. अशा शेतकऱ्यांविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे यूपी सरकारने म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना पशुसंवर्धन मंत्री धरमपाल सिंह म्हणाले, "कसाई आणि शेतकरी यांत फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ कसायांची नाही. आपली जनावरे निराधार सोडणाऱ्यांविरोधात प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.” ते विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सपा आमदार अवधेश प्रसाद यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
प्रसाद यांनी, भटक्या प्राण्यांच्या समस्येसंदर्भातील योजना आणि त्यांच्या मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईसंदर्भात प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना मंत्री म्हणाले, ही भटकी जनावरे नाहीत, त्यांना सोडण्यात आले आहे. त्यांना कोणी सोडले हे सर्वांना माहीत आहे. जेव्हा एक गाय दूध देते तेव्हा तीचे संगोपन केले जाते आणि जेव्हा ती दूध देणे बंद करते तेव्हा तिला सोडून दिले जाते.''
याशिवाय, राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत 15 मेपर्यंत 6,187 गो निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात तब्बल 8,38,015 जनावरांना ठेवण्यात आले आहेत, असेही धरमपाल सिंह यांनी सागितले.