अखिलेश यादवांना आणखी एक झटका, झेड प्लस सुरक्षा काढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 10:32 AM2019-07-23T10:32:18+5:302019-07-23T10:32:54+5:30
याआधी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी करण्यात आली होती.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याचा सरकार विचार करत आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या सुरक्षेतेसाठी असलेला ब्लॅक कॅट कमांडोचा ताफा कमी होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी झाली आहे. तसेच, एनएसजीला यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुलायम सिंह यादव आणि मायावती यांच्या सुरक्षेतेसाठी एनएसजी तैनात आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर आता अखिलेश यादव यांची सुरक्षा कमी करण्यात येत आहे. त्यामुळे एकप्रकारे अखिलेश यादव यांना दुसरा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यातील आघाडी तुटली. तर, या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने 10 आणि समाजवादी पार्टीने फक्त 5 जागांवर मिळविला आहे.
याआधी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. चंद्राबाबू नायडू यांना 2003 मध्ये तिरुपती येथील अलिपिरीमध्ये नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून चंद्राबाबू नायडू यांनी झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती.
चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षनेते...
आंध्र प्रदेशात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीचा दारूण पराभव झाला. त्या पक्षाचे केवळ २३ उमेदवारच विधानसभेवर निवडून आले आहेत. चंद्राबाबू नायडू राज्यातील विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. तेलगू देसम आमदारांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडून आलेले आमदार आणि पक्षाचे तीन खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करण्यात आला. त्यानंतर, चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाचा नेता म्हणून खासदार गल्ला जयदेव यांची नेमणूक केली. लोकसभेतील नेता म्हणून के. राजमोहन नायडू, तर राज्यसभेतील नेता म्हणून के. सत्यनारायण चौधरी यांचीही त्यांनी नियुक्ती केली.