Diwali 2018 : होऊ दे खर्च ! बाजारात सोन्याची मिठाई, चांदीचे फटाके
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 10:53 AM2018-11-06T10:53:58+5:302018-11-06T10:56:29+5:30
यंदाच्या दिवाळीत बाजारात सोन्याच्या मिठाईची जोरदार चर्चा सुरू आहे. सोन्याच्या मिठाईची किंमत तब्बल 50 हजार रुपये किलो एवढी आहे.
लखनौ - यंदाच्या दिवाळीत लखनौच्या बाजारात सोन्याच्या मिठाईची जोरदार चर्चा सुरू आहे. या सोन्याच्या मिठाईची किंमत तब्बल 50 हजार रुपये किलो एवढी आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानहून ही मिठाई मागवण्यात आली आहे. परदेशातून मागवण्यात आलेल्या या मिठाईमध्ये येथे सुका मेव्यासहीत 24 कॅरेट सोन्याची परत चढवण्यात आली. केवळ सोन्याची मिठाईच नाही तर येथील चांदीच्या फटाक्यांनाही मोठी मागणी आहे. येथे चांदीचे रॉकेट, फुलबाजा, भुईचक्र बनवण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे फटाके केवळ सजावटीसाठी तयार करण्यात आले आहेत. एकूणच यावेळेस लखनौमध्ये दिवाळीचे वेगळे रंग पाहायला मिळत आहेत.
सोन्याची मिठाई, हुबेहुब सोन्याच्या बिस्किटांप्रमाणे दिसत आहेत. कारण यावर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची परत चढवण्यात आली आहे. दिवाळीत मित्र परिवार, नातेवाईकांना भेट देण्यासाठी ही खास मिठाई बनवण्यात आली आहे. सोन्याच्या या मिठाईची किंमत 50, 000 रुपये एवढी आहे.
सर्वाधिक महाग मिठाई बनवणारी कंपनी छप्पनभोग स्वीट्सचे मालक रविंद्र गुप्ता यांनी म्हटले की, 'सोन्याची मिठाई देणे संपत्तीचा अभिमान असणं असे नाही. तर आपल्या आवडत्या व्यक्तिंना तुम्ही अद्भुत भेट देण्याची यामागे भावना असते. सर्वसामान्यांपर्यंत ही मिठाई पोहोचावी, ही माझी इच्छा होती. यासाठी एका-एका मिष्ठान्नाची मी खास स्वरुपात पॅकिंग केले आहे. अँटिक बॉक्समध्ये या मिठाईचं पॅकिंग करण्यात आले आहे. हे गिफ्ट तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये घेता येणार आहे.