उत्तर प्रदेशात गोरखपूर बालमृत्यूकांडाची पुनरावृत्ती, ऑक्सिजनअभावी 49 चिमुरड्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 10:23 AM2017-09-04T10:23:27+5:302017-09-04T11:16:16+5:30
फारुखाबाद येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने 49 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कायदायक घटना घडली आहे
लखनऊ, दि. 4 - गोरखपूर बालमृत्यूकांडानंतर देशाला हादरवून सोडणा-या घटनेची उत्तर प्रदेशात पुनरावृत्ती झाली आहे. फारुखाबाद येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने 49 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कायदायक घटना घडली आहे. एका महिन्यात 49 चिमुरड्यांचा जीव गेल्याने पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारवर टीका होत आहे. याप्रकरणी जिल्हा दंडाधिका-यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. रुग्णालयातील वरिष्ठांविरोधात निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोरखपूर घटनेला एक महिना उलटत नाही, तोच ही घटना समोर आली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतही ऑक्सिजनची कमतरता असल्यानेच मृत्यू झाले आहेत.
Farrukhabad: 49 children died in Ram Manohar Lohia Rajkiya Chikitsalay in a month, allegedly due to oxygen&medicines shortage, probe ordered pic.twitter.com/0SxDacZu7h
— ANI UP (@ANINewsUP) September 4, 2017
दरम्या नगोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय (बीआरडी) व रुग्णालयात ऑगस्टमध्ये झालेल्या बालमृत्यमुळे डॉ. काफिला खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात सहा दिवसांमध्ये ६३ बालकांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने १0 व ११ ऑगस्ट रोजी ३३ मुलांना जीव गमवावा लागला होता. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालकांनी २३ ऑगस्ट रोजी ७ जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्य सचिवांकडे तपासाची सूत्रे होती. त्या तपासाच्या आधारे वैद्यकीय शिक्षण अतिरिक्त मुख्य सचिवांना हटवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी प्राचार्य मिश्रा व त्यांच्या पत्नीला अटक केली. डॉ काफिल खान यांच्या सिलिंडर चोरीच्या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर आहे.
मुलांना वेळेत आणत नाहीत रुग्णालयात
गंभीर आजारी मुले व नवजात शिशू यांना अतिदक्षता कक्षात उपचारासाठी ठेवले जाते. यात मुदतीआधी जन्मलेली, कमी वजनाची तसेच कावीळ व अन्य संसर्गजन्य आजार असलेल्या बालकांचा समावेश असतो. मेंदुज्वर झालेल्या बालकांना अत्यंत गंभीर स्थितीत ऐनवेळी आणले जाते. अशा मुलांना उपचारासाठी वेळीच इस्पितळात आणल्यास नवजात बालकांना वाचविणे शक्य असते, असे प्राचार्य सिंह यांनी सांगितले.