नेपाळमध्ये कशासाठी गेला होता मुर्तझा? 'या' दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय; आणखी दोघांना पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 01:05 PM2022-04-05T13:05:51+5:302022-04-05T13:07:03+5:30
Gorakhpur Temple Attack : याप्रकरणी सध्या गोरखपूरच्या जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. यात आतापर्यंत कुशीनगर येथून 2 जणांना, संत कबीरनगर येथून एकाला तर महाराजगंज येथून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुर्तजा या लोकांशी चॅट बॉक्सद्वारे बोलायचा, असा आरोप आहे.
गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराबाहेर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या (Gorakhpur Temple Attack) अहमद मुर्तझा अब्बासीचे (Ahmad Murtaza Abbasi) कनेक्शन थेट दहशतवादाशी असल्याचे दिसत आहे. यानंतर आता या प्रकरणाची कसून चौकशी सुरू झाली आहे. त्याला मदत करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत. मुर्तझाच्या दोन साथीदारांना पोलिसांनी पकडले असून, त्यांनी त्याला मंदिरापर्यंत सोडले होते. मुर्तझाचा 'अंसार गजवातुल हिंद' या दहशतवादी संघटनेशी काही संबंध होता का? यासंदर्भात तपास सुरू आहे.
याप्रकरणी सध्या गोरखपूरच्या जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. यात आतापर्यंत कुशीनगर येथून 2 जणांना, संत कबीरनगर येथून एकाला तर महाराजगंज येथून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुर्तजा या लोकांशी चॅट बॉक्सद्वारे बोलायचा, असा आरोप आहे.
मुर्तझा गोरखनाथ मंदिराबाहेर कसा पोहोचला, त्याला ते शस्त्र कुठून मिळाले? याचाही तपास सुरू आहे. सध्या महाराजगंजमधील दोन तरुणांना पोलिसांनी पकडले आहे. ते मुर्तझाचे मित्र आहेत. या दोघांनी मुर्तझाला त्यांच्या बाईकवरून गोरखनाथ मंदिराबाहेर सोडले होते. एटीएसने त्यांना महाराजगंज येथून ताब्यात घेतले आहे. याशिवाय या छाप्यात काही जणांना पकडण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मिनहाज नावाच्या व्यक्तीचाही समावेश आहे. एटीएस त्याची चौकशी करत आहे. तो अन्सार गजवातुल हिंदशी संबंधित आहे. ब्रेनवॉश करून दहशतवादी बनवण्यात मिनहाज एक्सपर्ट असल्याचे बोलले जाते. यामुळे, मिनहाजनेच मुर्तझाचेही ब्रेनवॉश केले का? असा प्रश्नही उपस्थित होतो. UPATS मुर्तझा अब्बासी आणि मिनहाज यांच्या कनेक्शनचीही चौकशी करत आहे.
IIT इंजिनियर आहे अहमद मुर्तझा अब्बासी -
अहमद मुर्तझा अब्बासी यांनी २०१५ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. 2015 मध्ये इंजिनिअरिंगमधून उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आणि नंतर एस्सार पेट्रोकेमिकल्समध्ये नोकरी केली. त्याचे लग्न झालेले असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अहमद मुर्तझा अब्बासी याच्यावर अनेक डॉक्टरांनी उपचार केले असून, तो मुंबईत राहत होता. मुर्तझा अब्बासी याच्यावर अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून अहमद मुर्तझा अब्बासी याच्या मित्रांच्या भेटीगाठीही कमी झाल्या होत्या.