विच्छा माझी पुरी करा! अंतःकरणातून आवाज, मला भारतरत्न द्या; गोखपूरमधील युवकाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 12:54 PM2023-11-22T12:54:28+5:302023-11-22T12:56:27+5:30
विशेष म्हणजे या युवकाने प्रशासनाला दिलेले हे पत्र अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती भवनला पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गोरखपूर: भारत देशात अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. अजब-गजब घटनांमुळे काही प्रकरणांची चर्चाही होत असते. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधून समोर आले आहे. गोरखपूरमधील एका युवकाने थेट भारतरत्न पुरस्कार मिळण्याबाबत पत्र लिहिले आहे. भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी माझी इच्छा आहे. माझ्या अंतःकरणाचा आवाज मला तसे सांगतो आहे, अशा आशयाचे पत्र या युवकाने पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, याची जोरदार चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
पत्र लिहिणाऱ्या युवकाने स्वतःचे नाव विनोद कुमार गोंड असे सांगितले आहे. विनोदच्या म्हणण्यानुसार, तो गोरखपूरच्या सदर तहसीलमधील पिपराइच पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. ३० सप्टेंबर रोजी संध्यावंदनावेळी ध्यानस्थ बसलो असताना अचानक माझ्या अंतरात्म्यातून आपल्याला भारतरत्न मिळावा म्हणून जोरदार आवाज आला. माझी इच्छा पूर्ण व्हावी. मला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी विनंती आहे, असे पत्र विनोदने लिहिले आहे. यानंतर आता खासदार, आमदारांना इच्छा पूर्ण करण्यासाठी विनोद आवाहन करत आहे.
विनोदचे पत्र राष्ट्रपती भवनला पाठवले
संबंधित अधिकाऱ्यांनी विनोदचे पत्र राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवून दिले. अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, विनोद यांनी पाठवलेले पत्र पोस्ट ऑफिसकडून आले होते. त्यामुळे आम्ही पत्र पुढे पाठवले. याबाबत विनोदशी संपर्क केला असता, ही बाब नाकारली. पोलीस आयुक्तालयात जाऊन मी स्वतः जाऊन हे पत्र दिले. यावर, आम्ही पत्र पुढे पाठवतो, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले, अशी माहिती विनोद यांनी दिली.
कोण आहे विनोद कुमार गौंड?
विनोद हा ई-रिक्षा चालक आहे. ई-रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला दोन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांची रिक्षा चोरीला गेली होती. यानंतर विनोद एका कथावाचक व्यक्तीचा ड्रायव्हर झाला. तसेच पूजन, पठण, ध्यान वगैरे करू लागला. असाच सायंकाळी ध्यानाला बसला असताना, विनोदच्या अंतरात्म्यामधून आवाज आला की, ते जे करत आहेत त्याबद्दल त्यांना भारतरत्नने सन्मानित केले जावे. विनोदचे भारतरत्न असलेले मागणीपत्र गोरखपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले होते. यानंतर हे पत्र डीएम, जॉइंट मॅजिस्ट्रेट/एडीएम सदर, तहसीलदार सदर, सीडीओ यांच्या स्वाक्षरीसह पुढे पाठविण्यात आले. या पत्राबाबत अधिकारी काही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. हे पत्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.