नवरदेवाला हिंदी वृत्तपत्र वाचता आलं नाही, नवरीनं वरात दरवाजात येताच मोडलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 01:41 PM2021-06-25T13:41:35+5:302021-06-25T13:42:16+5:30
यानंतर लग्ना लावून देणाऱ्या मध्यस्थाला मुलाचा चश्मा काढण्यास सांगण्यात आले. यावर मुलाने चश्मा काढला. यानंतर त्याला (नवरदेव शिवम) विधी करायला सांगण्यात आले, मात्र, त्याला विना चश्म्याचा अडथळा येत होता.
लखनौ - आपण लग्न मोडल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील आणि बघितल्याही असतील. मात्र उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात नवरदेवाला हिंदी वृत्तपत्र वाचता आलं नाही म्हणून नवरीनं लग्न मोडल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही, तर मुलीकडच्यांनी नवरदेवाकडील लोकांवर गुन्हादेखील दाखल केला आहे. या नवरदेवाला चश्मा न लावता वाचता न आल्यानं हा संपूर्ण प्रकार घडला.
ज्या घरात 2 दिवसांपूर्वीच मंगलगीतांचा आवाज ऐकायला येत होता, त्याच घराच्या दरवाज्यावर वरात पोहोचताच नवरदेवाला चश्म्यावर पाहून सर्वांनाच धक्काच बसला. यानंतर मुली कडच्यांनी संबंधित मुलाला चश्म्याशिवाय काहीही दिसत नाही, असा आरोप केला आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यातील जमालीपूर येथील आहे. या गावातील अर्जुन सिंह यांनी आपली मुलगी अर्चना हीचा विवाह बंशी पोलीस ठाणे क्षेत्रातील अछल्दा येथील शिवम नावाच्या तरुणाशी निश्चित केला होता. यानंतर संपूर्ण तयारीसह लग्न उत्सव आणि लग्नाची तारीखही काढण्यात आली. मुलीकरडच्यांनीही संपूर्ण तयारी केली होती. एवढेच नाही, तर हुंड्याच्या स्वरुपात दूचाकी आणि रोख रक्कमही देण्यात आली होती. यानंतर निश्चित करण्यात आलेल्या तारखेला, म्हणजेच 20 जूनला वरात दारात आल्यानंतर नवरदेवाने संपूर्ण वेळ चश्मा लावूनच ठेवला होता. यामुळे घरातील महिलांना आणि मुलीच्या वडिलांना शंका आली.
यानंतर लग्ना लावून देणाऱ्या मध्यस्थाला मुलाचा चश्मा काढण्यास सांगण्यात आले. यावर मुलाने चश्मा काढला. यानंतर त्याला (नवरदेव शिवम) विधी करायला सांगण्यात आले, मात्र, त्याला विना चश्म्याचा अडथळा येत होता. त्याची दृष्टी बरीच कमकुवत होती. हे पाहून वधू अर्चनाने लग्न करण्यास आपण तयार नसल्याचे सांगितले. यावर वधू पक्षाचे एकमत झाले. त्यांनी हुंड्यात दिलेली रोख रक्कम आणि दूचाकी परत करण्याची मागणी केली. यावर मुलाकडच्यांनीही काहीही देण्यास नकार दिला. यानंतर मुलीकडच्यांनी औरेया पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.