उत्तर प्रदेश आधीच जिंकले, पुढील मतदान ‘बोनस’साठी!
By admin | Published: March 2, 2017 04:05 AM2017-03-02T04:05:23+5:302017-03-02T04:05:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथील प्रचार सभेत ‘उत्तर प्रदेश जिंकल्याचा’ दावा केला.
महाराजगंज : अत्यंत गरमागरमीच्या राजकीय वातावरणात होत असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन फेऱ्या अद्याप शिल्लक असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथील प्रचार सभेत ‘उत्तर प्रदेश जिंकल्याचा’ दावा केला. राहिलेल्या दोन फेऱ्यांमध्ये आणखी बोनस मिळून भारतीय जनता पार्टी दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल, असा आत्मविवासही त्यांनी व्यक्त केला.
सभेतील श्रोत्यांना उद्देशून मोदी म्हणाले की, याआधी झालेल्या मतदानाच्या पाच फेऱ्यांमध्ये मतदारांनी भाजपाला विजयी केले आहे. आता यापुढील सहाव्या व सातव्या फेऱ्यांमध्ये तुम्ही आम्हाला फक्त ‘बोनस’ द्यायचा आहे. गेल्या १५ वर्षांत ज्यांनी उत्तर प्रदेशची लूट केली त्यांना लोक या निवडणुकीत अद्दल घडवतील, असे सांगून मोदी उपरोधाने म्हणाले, मी संपूर्ण भारतात ‘स्वच्छ भारत’ मोहीम सुरु केली. पण उत्तर प्रदेशच्या लोकांनी हे अभियान एका वेगळ््याच पातळीवर नेऊन राज्याच्या राजकारणाचीच सफाई सुरु केली!
समाजवादी पक्ष व काँग्रेसची अभद्र युती उत्तर प्रदेशला आणखी खड्ड्यात घालेल, अशी टीका करून मोदी म्हणाले की, यापैकी एका पक्षाला देशाची वाट लावण्याचा तर दुसऱ्या पक्षाला उत्तर प्रदेशची वाट लावण्याचा दांडगा अनुभव आहे. असे दोघे एकत्र आले तर बट्ट्याबोळ नाही तर दुसरे काय होणार? उत्तर प्रदेशमधील जीवन ‘अल्पायुषी व अनिश्चित’ असल्याचे राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरच म्हटल्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, याचा अर्थ उत्तर प्रदेशची अवस्था सहारा वाळवंटातील आफ्रीकी देशांसारखी आहे. (वृत्तसंस्था)
>आज प्रचार संपणार
पूर्व उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांत ४९ जागांसाठी चार मार्च रोजी मतदान होत असून तेथील प्रचार गुरुवारी संपेल. मतदानाचा हा सहावा टप्पा असून समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या आझमगढ लोकसभा मतदार संघात या टप्प्यात मतदान होईल. सुमारे १.७२ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
>‘नारियल’ नव्हे ‘नारिंग’
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पूर्व इम्फाळमधील भाषणाची टर उडवत मोदी म्हणाले, काल एका काँग्रेस नेत्याने नारळाचा रस काढून तो लंडनला नेऊन विकण्याची वल्गना केली. नारळ केरळमध्ये पिकतात व लिंबू, संत्रे, मोसंबी यांचा रस काढतात. नारळाचा रस काढल्याचे मी तरी ऐकले नाही. मोदींच्या या भाषणाची काँग्रेसने लगेच दखल घेतली आणि राहुल गांधी ‘नारियल’ नव्हे तर ‘नारिंग’ म्हणाले होते असे सांगून पक्षाने राहुलच्या त्या सभेचा व्हिडिओही प्रसिद्ध केला.
>मोदींच्या मांडीवरच जास्त राजकीय पक्ष
देवरिया : समाजवादी पक्षाने काँगे्रसला आपल्या मांडीवर बसवले असल्याच्या नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बुधवारी टीका करताना मोदी यांच्याच मांडीवर जास्त पक्ष बसले आहेत, असे म्हटले. मोदी यांची मांडी ही मोठी असल्यामुळे आघाडीतील अनेक पक्षांना बसण्यासाठी तिच्यावर जागा आहे, असे यादव येथील प्रचार सभेत म्हणाले. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने काय केले याचा हिशेब द्यावा, असेही यादव म्हणाले.