उत्तर प्रदेशवर सर्वाधिक कर्ज, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर; जाणून घ्या किती आहे राज्यावर कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 04:27 AM2020-10-22T04:27:58+5:302020-10-22T07:04:35+5:30
भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी निदेशक मृदुल के. सागर यांनी राज्यांची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येचे प्रमाण यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली.
नवी दिल्ली : देशभरात उत्तर प्रदेशवर सगळ्यात जास्त कर्ज आहे. गेल्या तीन वर्षांत उत्तर प्रदेशवर कर्जाचा बोजा २७ टक्क्यांनी वाढला आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात उत्तर प्रदेशवर ४.७३ लाख कोटी रुपये कर्ज होते. त्यात वाढ होऊन हे कर्ज २०१९-२० या आर्थिक वर्षात ६.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कर्जाच्या आकडेवारीत उत्तर प्रदेशखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महाराष्ट्रावर ५.०२ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकावर दरडोईवर ४४,७३४ रुपयांचे, तर उत्तर प्रदेशच्या प्रत्येक नागरिकावर दरडोई ३० हजार रुपयांचे कर्ज आहे. दरडोई कर्जाच्या आकडेवारीत पंजाब अव्वल स्थानी असून, तिथे दरडोई ८२ हजार रुपयांच्या वर कर्जाचा भार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी निदेशक मृदुल के. सागर यांनी राज्यांची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येचे प्रमाण यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली. बिहार आणि झारखंड यासारखी राज्ये आकडेवारीत पिछाडीवर आहेत. बिहारवर १.८५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर झारखंडवर ०.९१ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. बिहारमध्ये दरडोई १७,८३० रुपये, तर झारखंडमध्ये दरडोई २७,६७० रुपयांचे कर्ज आहे.