धक्कादायक! अपघातातील जखमी व्यक्तीला फरशीवर झोपवले; कुत्रा येऊन रक्त चाटून गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 03:56 PM2022-11-03T15:56:51+5:302022-11-03T15:59:30+5:30
या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 6 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कुशीनगर:उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील सरकारी रुग्णालयात अपघातातील जखमी व्यक्तीला आणले होते, त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते. यावेळी त्याच्यावर उपचार करण्याऐवजी, त्या व्यक्तीला फरशीवर झोपवले. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी एक कुत्रा येऊन जखमीचे रक्त चाटून गेला. या घटनेनंतर रुग्णालयातील 6 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, 1 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजता कुशीनगर जिल्हा रुग्णालयात अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला आणले. यावेळी रुग्णालयात डॉक्टर किंवा इतर कर्मचारी उपस्थित नव्हते. त्या जखमीवर उपचार करण्याऐवजी, त्याला खाली फरशीवर झोपवले. यावेळी एक कुत्रा त्या व्यक्तीच्या आजुबाजूला फिरत होता. त्या कुत्याने जखमीच्या जवळ येऊन त्याचे रक्त चाटून गेला. रुग्णालयातील इतर रुग्णांनी या घटनेचा व्हिडिओही काढला.
या घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अपघातात जखमी झालेला व्यक्ती जमिनीवर पडलेला आणि कुत्रा रुग्णाचे रक्त चाटताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जमिनीवर पडलेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्हा रुग्णालयात असा प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांनावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.