आज लक्ष्मणाच्या मूर्तीचे अनावरण; लवकरच शहराचे नाव बदलणार, लखनौ होणार 'लक्ष्मणपूर'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 08:03 PM2023-02-09T20:03:24+5:302023-02-09T20:13:37+5:30
गेल्या काही दिवसांपासून लखनौ शहराचे नाव पूर्वीप्रमाणे 'लक्ष्मणपूर' करण्याची मागणी होत आहे.
लखनौ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे (Lucknow) नाव 'लखनपूर' किंवा 'लक्ष्मणपूर' असे ठेवण्याच्या मागणीवरुन राजकारण तापले आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाने (BJP) या दिशेने पुढे जाण्याचे स्पष्ट केले आहे. तर, 'भाजपकडे दुसरं काही काम नाही. असे डावपेच अवलंबून भाजपला देशाचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आहे. भाजप लक्ष देश विकण्यावरच आहे, असा आरोप समाजवादी पक्षाने (SP) केला आहे. आता लखनौचे नाव बदलण्यावरुन भाजप आणि सपा आमने-सामने आले आहेत.
लखनौमध्ये 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये देश-विदेशातील दिग्गज उद्योगपती सहभागी होत आहेत. यातच अमौसी विमानतळावर उतरताच लोकांना लक्ष्मणाची भव्य मूर्ती पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी लक्ष्मणजींच्या 20 फूट उंच आणि 1200 किलो वजनाच्या विशाल पुतळ्याचे उद्घाटन केले आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी 50 लाख खर्च करुन ही मूर्ती तयार केली आहे. पुतळ्याच्या उद्घाटनासोबतच भाजपने एका दगडात दोन लक्ष्य साधण्याची तयारी केली आहे. भाजपने लखनौचे नाव बदलण्याची कसरत सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
Uttar Pradesh | CM Yogi Adityanath and Defence Minister Rajnath Singh unveil an idol of lord Laxman, in Lucknow. Deputy CM Brajesh Pathak also present on the occasion. pic.twitter.com/eMf4lD6Xu5
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 9, 2023
उपमुख्यमंत्री काय म्हणाले?
बुधवारी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, पूर्वी या शहराचे नाव 'लक्ष्मण नगरी' होते, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आता परिस्थितीनुसार कारवाई केली जाईल. भाजपचे मंत्री संजय निषाद म्हणतात की, लखनौचे नाव बदलून लखनपुरी केले तर त्यात गैर काय? आपली सभ्यता जिवंत ठेवण्याची गरज आहे. तर, प्रतापगडचे भाजप खासदार संगम लाल गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखनौचे नाव बदलून लक्ष्मणपूर किंवा लखनपूर करण्याची मागणी केली. 18 व्या शतकात नवाब असफुद्दौलाने शहराचे नाव बदलून लखनौ केले होते.