बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 09:16 AM2024-05-08T09:16:43+5:302024-05-08T09:17:29+5:30
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशातील निवडणूक ऐन भारात आली असताना मायावती यांनी पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मायावती यांनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून उचलबांगडी केली आहे. तसेच मायावतींनी बसपाच्या उत्तराधिकारीपदाची जबाबदारीही काढून घेतली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवजणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होत आहे. मागच्या वेळी महाआघाडीच्या माध्यमातून दहा जागा जिंकणाऱ्या लोकसभा निवडणुकी मायावती यांनी त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील निवडणूक ऐन भारात आली असताना मायावती यांनी पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मायावती यांनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून उचलबांगडी केली आहे. तसेच मायावतींनी बसपाच्या उत्तराधिकारीपदाची जबाबदारीही काढून घेतली आहे. मायावती यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
मायावती यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये सांगितले की, बहुजन समाज पक्ष हा एका राजकीय पक्षासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मसन्मान, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाची एक चळवळ आहे. त्यासाठी माननीय काशीराम आणि मी स्वत: संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. तसेच त्याला गती देण्यासाठी नव्या पिढीलाही तयार केलं जात आहे.
त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये सांगितलं की, या क्रमामध्ये पक्षात, इतर लोकांना पुढे आणण्यासोबत आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक आणि माझा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र पक्ष आणि चळवळीचं व्यापक हित विचारात घेऊन पूर्ण परिपक्वता येईपर्यंत त्यांना या दोन्ही प्रमुख जबाबदाऱ्यांवरून बाजूला करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वडील आनंद कुमार पक्ष आणि चळवळीमध्ये आपली जबाबदारी पूर्वीप्रमाणे बजावत राहतील. बसपाचं नेतृत्व पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी डॉ. आंबेडकर यांचा वारसा पुढे नेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करण्यापासून मागे हटणार नाही.
मायावती यांनी गतवर्षी आकाश आनंद यांना आपलं उत्तराधिकारी नियुक्त केलं होतं. त्यामुळे आता त्यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान सीतापूर येथे एका सभेत आकाश आनंद यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यासह इतर चार जणांविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.