Manish Gupta Murder: मनीष गुप्ता हत्याकांड; आरोपी पोलिसाच्या घरावर 'बुलडोजर'ने कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 07:46 PM2022-04-03T19:46:07+5:302022-04-03T19:46:13+5:30
Manish Gupta Murder: व्यापारी मनीष गुप्ता यांच्या हत्येतील आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे आलिशान 3 मजली घर बुलडोझरने पाडण्यात आले आहे.
गोरखपूर:उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात माफिया आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर बुलडोझरने कारवाई करण्यात येत आहे. यामुळे राज्यभरात योगींना बुलडोझर बाबा अशी उपाधी देण्यात आली आहे. दरम्यान, गोरखपूरमधील व्यापारी मनीष गुप्ता यांच्या हत्याकांडातील आरोपींवरही प्रशासनाने अशाच प्रकारची कारवाई केली आहे.
मनीष गुप्ता यांच्या हत्येतील आरोपी पोलीस निरीक्षकाचे घर बुलडोझरच्या मदतीने पाडण्यात आले आहे. आरोपी पोलीस निरीक्षक जगत नारायण सिंह याचे 3 मजली घर पाडण्यात आले आहे. सध्या जगत नारायण सिंग याच्यासह घटनेतील आरोपी असलेले सहा पोलीस तुरुंगात आहेत. जगंत नारायण सिंग याचे 3 मजली घर चिन्हाटच्या सात्रीख रोडवरील देवराजी विहारमध्ये बांधले होते. एलडीएकडून नकाशा पास न करता हे आलिशान घर बांधण्यात आल्याने कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे मनीष हत्याकांड ?
गेल्या वर्षी 27 सप्टेंबरच्या रात्री कानपूरचे व्यापारी मनीष गुप्ता यांचा रामगढताल पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. मनीष गुप्ता त्यांच्या मित्रांसोबत गोरखपूरला मित्राला भेटण्यासाठी आले होते. यादरम्यान काही पोलीस त्यांच्या हॉटेलच्या रुममध्ये घुसले आणि त्यांना मारहाण केली, यातच त्यांचा मृत्यू झाला. एसआयटीद्वारे तपासात जगत नारायण सिंग आणि इतर सहा पोलीस यात दोषी आढळले होते. या सर्व आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.