भाजपानं दाखवली तिहेरी तलाक विधेयक आणण्याची हिंमत, मुस्लिम महिला करणार कमळाला मतदान?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 02:14 PM2019-05-04T14:14:19+5:302019-05-04T14:17:29+5:30
उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला असलेल्या एका 33 वर्षीय मुस्लिम महिलेनं तिहेरी तलाक देण्याऐवजी पतीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे.
लखनऊः उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला असलेल्या एका 33 वर्षीय मुस्लिम महिलेनं तिहेरी तलाक देण्याऐवजी पतीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. विशेष म्हणजे तिने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला आहे. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या या महिलेनं सांगितलं की, मी माझ्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात न्यायालयात जाणार आहे. तसेच 6 मे रोजी मी भाजपालाच मतदान करणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.
ती मुस्लिम महिला म्हणाली, मोदी सरकारनं तिहेरी तलाकविरोधात आवाज उठवण्याची हिंमत दाखवली, दुसरा कोणताही पक्ष यासंदर्भात साधी वाच्यताही करत नाही. या महिलेनं गेल्या वेळी काँग्रेससाठी प्रचार केला होता. 2014मध्ये या महिलेला तिच्या नवऱ्यानं कोणतंही कारण नसताना लग्नाच्या 22 दिवसांनंतर तलाक दिला होता. महिलेच्या माहितीनुसार, तिनं गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रिटा बहुगुणा यांच्यासाठी प्रचार केला होता. तिनं यावेळी काँग्रेसला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी आमच्यासाठी काय केलं. भाजपानं कमीत कमी आमची खराब परिस्थिती तरी लोकांसमोर आणली.
मोदी सरकारनं पेन्शन योजनांपासून एलपीजी गॅस कनेक्शनपर्यंत आमच्यासाठी बरंच काही केलं. सरकारनं केलेल्या कामांमुळेच मी त्यांना मतदान करणार असल्याचंही या मुस्लिम महिलेनं आवर्जून सांगितलं आहे. या महिलेसारखंच 26 वर्षांच्या निशात फातिमानंही तिहेरी तलाकचा अध्यादेश आणल्यामुळे भाजपाला मतदान करण्याचं मनोमन ठरवून टाकलं आहे. दोन मुलांची आई असलेल्या निशातला पतीनं 5 वर्षांनंतर फोनवरून तलाक दिला.
निशातनीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून मदतीसाठी याचना केली. त्यानंतर ती भाजपाकडून करण्यात आलेल्या तिहेरी तलाकच्या सीमेनारमध्येही उपस्थित राहिली. उत्तर प्रदेशात कमीत कमी 20 टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे. हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या भाजपाला यंदा तिहेरी तलाकमुळे मुस्लिम मतं मिळण्याची शक्यता आहे.