लग्नात गोंधळ! नागिन डान्सवरून वऱ्हाडी भिडले; एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी हाणले, 5 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 03:27 PM2023-03-17T15:27:10+5:302023-03-17T15:30:44+5:30
लग्नामध्ये झालेल्या या गोंधळात पाच जण जखमी झाले. हाणामारीनंतर वरातीत चेंगराचेंगरी झाली.
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये वरातीत नागिन डान्सवरून दोन पक्षांमध्ये झालेल्या वादात पाच जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण लखीमपूर खेरीच्या मितौली पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे, जिथे कल्लू नावाच्या व्यावसायिकाचा धाकटा भाऊ फहनूरचं लग्न मितौली शहरात राहणाऱ्या अलाउद्दीनच्या मुलीशी ठरलं होतं.
16 मार्चच्या रात्री जेव्हा वरात वाजत-गाजत मुलीच्या घराकडे निघाली, त्याचवेळी काही पाहुण्यांनी नागिन डान्सची धून वाजवायला सांगितली. त्यामुळे वरातीत सहभागी झालेले काही लोक संतापले तर काही नाराज झाले. त्यावरून दोन्ही बाजुच्या लोकांमध्ये वाद झाला. काही गोष्टींवरून पुढे वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार हाणामारी झाली.
लग्नामध्ये झालेल्या या गोंधळात पाच जण जखमी झाले. हाणामारीनंतर वरातीत चेंगराचेंगरी झाली. सर्व जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मितौली येथे दाखल करण्यात आले. गोंधळ झाल्यानंतर वरातीत सहभागी ज्येष्ठांनी समज देऊन प्रकरण शांत केले. मुलाचा भाऊ कल्लू याने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. गाण्यावरून वरातीत झालेल्या भांडणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"