Uttar Pradesh Politics: अखिलेशवर मायावतींचा पलटवार; "जे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ते दुसऱ्यांना पंतप्रधान कसे करणार..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 10:21 AM2022-04-29T10:21:36+5:302022-04-29T11:25:12+5:30
Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर आता सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा सुप्रीमो मायावती देशाच्या राष्ट्रपतीपदावरुन आमनेसामने आले आहेत.
Mayawati vs Akhikesh Yadav: सध्या उत्तर प्रदेशात बसपा सुप्रीमो मायावती (Mayawati) आणि सपा सुप्रीमो अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळतं आहे. ''मायावती देशाच्या पंतप्रधान व्हाव्यात'', असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावर आता मायावती यांची तिखट प्रतिक्रिया आली आहे. ''जे स्वतः एका राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ते दुसऱ्यांना पंतप्रधान कसे करणार," अशी टीका मायावती यांनी केली आहे.
'यूपीत सपाचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही'
मायावती म्हणाल्या की, "यूपीमध्ये मुस्लिम आणि यादव समाजाची पूर्ण मते घेऊन, तसेच अनेक पक्षांशी युती करुनही सपा प्रमुखांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही, तर ते इतरांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार आहेत? लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बसपासोबत युती करून केवळ 5 जागा जिंकू शकले, मग ते बसपा प्रमुखांना पंतप्रधान कसे करू शकतील? त्यामुळे त्यांनी अशी बालिश विधाने करणे बंद करावीत. यूपीमध्ये मुख्यमंत्री होण्याचे सपाचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही," अशी घणाघाती टीका मायावती यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी सुरू झाला वाद
मायावती आणि अखिलेश यांच्यातील हा वाद दोन दिवसांपूर्वी सुरू झाला होता. अखिलेश यादव एका कार्यक्रमात म्हणाले होते की, "भाजपने बसपची मते जिंकली आहेत, भाजप आता मायावतींना राष्ट्रपती करणार का?" अखिलेशच्या या वक्तव्यावर मायावतींनी पलटवार करत म्हटले होते की, "त्या यूपीच्या मुख्यमंत्री किंवा देशाच्या पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतात, पण राष्ट्रपती होण्याचे नाही. यूपीमध्ये भाजपच्या विजयाला सपा जबाबदार आहे. यूपीच्या सीएम पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी सपा मला राष्ट्रपती बनवण्याचे स्वप्न पाहत आहे," असे मायावती म्हणाल्या.