एका क्षणात कोसळले तीन मजली घर; संपूर्ण कुटुंब संपलं, ९ मृतदेह काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 10:01 AM2024-09-15T10:01:29+5:302024-09-15T10:09:29+5:30

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये शनिवारी तीन मजली घर कोसळून आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

Uttar Pradesh Meerut building accident 9 people died 5 injured | एका क्षणात कोसळले तीन मजली घर; संपूर्ण कुटुंब संपलं, ९ मृतदेह काढले बाहेर

एका क्षणात कोसळले तीन मजली घर; संपूर्ण कुटुंब संपलं, ९ मृतदेह काढले बाहेर

Meerut Building Collapse : उत्तर प्रदेशात आठवड्याभरातच दुसरी इमारत कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील झाकीर कॉलनीत तीन मजली घर कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून १३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून आणखी काही जणं ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये शनिवारी ही मोठी दुर्घटना घडली. तीन मजली घर कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. या अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून अनेक जण जखमी आहेत. ढिगाऱ्याखालून १३ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अजून दोन जण ढिगाऱ्याखाली दबले असून त्यांचा शोध सुरू आहे.

मेरठच्या लोहिया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाकीर कॉलनीत शनिवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान ही घटना घडली. इथले ५० वर्षे जुने तीन मजली घर अचानक कोसळले. त्याखाली अनेकजण गाडले गेले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक गेल्या अनेक तासांपासून बचाव कार्यात गुंतले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अरुंद रस्ता असल्याने ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९० वर्षांच्या नफीसा या चार मुलांच्या कुटुंबासह या घरात राहत होत्या. खालच्या मजल्यावर दुग्धव्यवसायाचे काम केले जात होते आणि त्यांच्याकडे अनेक गायी आणि म्हशी होत्या ज्या आता ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या आहेत. हे घर एकाच खांबावर उभे होते, जो जीर्ण अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. खांब कमकुवत झाल्यामुळे आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे तो कमकूवत झाला आणि ही धक्कादाय दुर्घटना घडली.

राज्याच्या मदत आयुक्त कार्यालयाने सकाळी जारी केलेल्या निवेदनात नऊ जणांच्या मृत्यूची माहिती दिली. "घर अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली  लोक गाडले गेले. आतापर्यंत एकूण १३ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आले असून त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जखमींना लाला लजपत राय मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरितांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत," असं या निवेदनात म्हटलं आहे.

Web Title: Uttar Pradesh Meerut building accident 9 people died 5 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.