राम मंदिर उभारणीसाठी मुस्लिमांना कर सेवेचे आवाहन करणा-या उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची हकालपट्टी
By admin | Published: December 25, 2015 11:38 AM2015-12-25T11:38:59+5:302015-12-25T11:50:55+5:30
अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी मुस्लिमांनी सहकार्य करावे असे वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशमधील मंत्री ओमपाल नेहरा यांची हकालपट्टी करण्यात आली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी आलेल्या 'शिळां'मुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असतानाच उत्तर प्रदेशमधील मंत्री ओमपाल नेहरा यांनी मंदिर उभारणीसाठी मुस्लिमांनी सहकार्य करावे असे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. हे वक्तव्य करणारे नेहरा यांची मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मंत्रीमंडळातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे. पम एकंदरच मंदिर उभारणीचा हा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांचे जवळचे व विश्वासू मानले जाणारे ओमपाल नेहरा हे अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये राज्य मंत्री असून बिजनौरमधील सभेत त्यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी मुस्लिमांनी सहकार्य करावे असे वक्तव्य केले. मंदिर उभारणी सुरू झाल्यास मुस्लिमांनी कर सेवा द्यायला हवी असे आवाहन त्यांनी केले होते. मात्र त्यांचे हे विधान त्यांच्यावरच उलटले असून अखिलेश सरकारने त्यांनाच मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.