Uttar Pradesh MLC election result 2022: मोदींचा सुदामा हरला! वाराणसीत डिपॉझिटही वाचवू शकली नाही भाजपा; तीन जागांवर एमएलसी निवडणूक गमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:20 PM2022-04-12T15:20:31+5:302022-04-12T15:20:52+5:30
भाजपाने ३६ पैकी ३३ जागा जिंकल्या आहेत. परंतू तीन गमावल्या आहेत, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसी येतो.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये ३६ पैकी ९ जागांवर भाजपाने बिनविरोध विजय मिळविला होता. तर उर्वरित २७ जागांसाठी निवडणूक झाली. याचा आज निकाल जाहीर झाला. भाजपाने या २७ पैकी २४ जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. परंतू, एक जागा अशी आहे की, जिथे खोलवर घाव मिळाला आहे.
भाजपाने ३६ पैकी ३३ जागा जिंकल्या आहेत. परंतू तीन गमावल्या आहेत, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसी येतो. यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. माफिया आणि एमएलसी बृजेश सिंह यांची पत्नी अन्नपूर्णा सिंह अपक्ष म्हणून तिथे निवडून आली आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे भाजपाच्या उमेदवाराला तिथे डिपॉझिटही गमवावे लागले आहे. वाराणसी-चंदौली-भदोही सीटवर भाजपाचे उमेदवार सुदामा पटेल हरले आहेत. अन्नपूर्णा सिंह यांना 4234 मते मिळाली तर सपाचे उमेदवार उमेश यादव यांना 345 आणि भाजपाला 170 मते मिळाली. गेल्या दोन दशकांपासून ही जागा बृजेश सिंहांच्याच ताब्यात आहे.
प्रतापगढ़ मतदारसंघातदेखील भाजपाला पराभव मिळाला आहे. भाजपाचे माजी आमदार हरिप्रताप सिंह यांना राजा भैयाच्या पक्षाचे उमेदवार गोपाल भैया ने पराभूत केलेआहे. अक्षय प्रताप बाहुबली नेते आहेत. आजमगढ़मध्ये देखील अपक्ष उमेदवार विक्रांत सिंह रिशू जिंकले आहेत. सपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. याचबरोबर भाजपाची विधान परिषदेतील संख्याबळ ६७ झाले असून बहुमतापेक्षा १६ ने जास्त आहे.