आता उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य, जबरदस्त काम करतायत मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींकडून योगींचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:47 PM2021-07-15T12:47:43+5:302021-07-15T12:49:07+5:30
मोदी म्हणाले, 2017 पूर्वीही दिल्लीतून उत्तर प्रदेशसाठी पैसा पाठविला जात होता. मात्र, तेव्हा लखनौत त्याला अडथळा यायचा. आज योगीजी प्रचंड परिश्रम करत आहेत.
वारानसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी वाराणसी (Narendra Modi in Varanasi) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या योजनांची सुरुवात केली. येथील स्थानिक जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचेही (Yogi Adityanath) तोंडभरून कौतुक केले. मोदी म्हणाले आज उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे. मुख्यमंत्री योगी प्रचंड मेहनत करत आहेत.
'विकास कामांवर असते योगींची नजर' -
मोदी म्हणाले, 2017 पूर्वीही दिल्लीतून उत्तर प्रदेशसाठी पैसा पाठविला जात होता. मात्र, तेव्हा लखनौत त्याला अडथळा यायचा. आज योगीजी प्रचंड परिश्रम करत आहेत. स्वतः योगी येथे येऊन विकास कामांवर लक्ष ठेवतात. ते प्रत्येक जिल्ह्यात जातात आणि वेग-वेगळ्या कामांवर लक्ष ठेवतात. यामुळेच उत्तर प्रदेशात परिवर्तन होताना दिसत आहे.
'आता उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य' -
पंतप्रधान मोदी म्हणाले, माफिया राज आणि बोकाळत सुटलेल्या दहशतवाद, यांना आता कायद्याचा चाप बसला आहे. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. आज गुन्हेगारांना समजले आहे, की ते कायद्यातून वाचू शकणार नाहीत. उत्तर प्रदेश सरकार आज भ्रष्टाचार आणि घराणेशाहीपासून मुक्त आहे. यूपी सरकार विकासवादावर चालत आहे. आता येथे जनतेच्या योजनांचा फायदा थेट जनतेला मिळत आहे.
यूपी में सरकार आज भ्रष्टाचार और भाई-भतीजावाद से नहीं विकासवाद से चल रही है।
— PMO India (@PMOIndia) July 15, 2021
इसीलिए, आज यूपी में जनता की योजनाओं का लाभ सीधा जनता को मिल रहा है।
इसीलिए, आज यूपी में नए-नए उद्योगों का निवेश हो रहा है, रोजगार के अवसर बढ़ रहे हैं: PM @narendramodi
कोरोना व्यवस्थापनाचं केलं कौतुक -
कोरोनासंदर्भात बोलताना मोदींनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. पीएम मोदी म्हणाले, उत्तर प्रदेशची लोकसंख्या अनेक देशांपेक्षा अधिक आहे. तरीही येथील सरकार आणि लोकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला.
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्यातील अनेक नेत्यांनी भाष्य केले होते, की उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा चेहरा कोण असेल, हे केंद्रीय नेत्व ठरवेल. यातच आज पंतप्रधान मोदींनी स्वतःच सीएम योगींचे उघडपणे कौतुक केले आहे. यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो.