सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न अन् गुंडांबरोबरच्या चकमकीत पोलीस शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 08:59 AM2019-01-28T08:59:36+5:302019-01-28T09:01:20+5:30
उत्तर प्रदेशमधल्या अमरोहामध्ये गुंडांबरोबरच्या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाला आहे.
लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या अमरोहामध्ये गुंडांबरोबरच्या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाला आहे. बछरायू भागातल्या इंद्रपूर गावामध्ये ही घटना घडली आहे. शहीद झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव हर्ष चौधरी आहे. पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या भागाला चारही बाजूंनी घेराबंदी करण्यात आली असून, पोलिसांनी गुंडांची धरपकड सुरू केली आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात हर्ष चौधरी शहीद झाले.
गोळीबारात जखमी झालेल्या हर्ष चौधरी यांना तात्काळ मुरादाबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच पोलीस कॉन्स्टेबल हर्ष चौधरी यांचं लग्न झालं होतं. पोलिसांनी या चकमकीतला म्होरक्या शिव अवतार ऊर्फ शिविया याचा खात्मा केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या गुंडांविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. नेहमीसारखीच तपासणी करत असताना पोलिसांनी या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवियानं पोलिसांवरच गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही उत्तरादाखल त्या गुंडांवर गोळीबार केला. शहीद हर्ष चौधरी हे 2016मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांत भरती झाले होते.
सहा महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांची बदली अमरोहातल्या बछरायू पोलीस स्टेशनमध्ये झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर अतीव दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी शहीद हर्ष चौधरीच्या पत्नीला 40 लाख रुपये देण्यासह हर्षच्या आई-वडिलांना 10 लाखांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच हर्ष चौधरीच्या पत्नीला पोलिसांकडून पेन्शनही देण्यात येणार आहे. तसेच परिवारातील एका व्यक्तीला पोलिसांत नोकरी मिळणार आहे.
CM Yogi Adityanath announces compensation of Rs 40 lakhs for the wife & Rs 10 lakh for the parents, & service for one member of the family of constable Harsh Chaudhary who lost his life in an encounter with criminals in Amroha earlier today. A criminal was killed in the encounter pic.twitter.com/MCqqZ1Q7ax
— ANI UP (@ANINewsUP) January 27, 2019