हत्येच्या ७ वर्षानंतर महिला जिवंत परतली; तिच्या हत्येप्रकरणी २ जणांनी भोगली ३ वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 03:59 PM2022-12-11T15:59:03+5:302022-12-11T15:59:43+5:30
Woman returned alive after 7 years of murder: राजस्थानमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांचे मोठे आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
नवी दिल्ली : राजस्थानमधील दौसा येथून मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर इथे एका महिलेने पोलिसांना देखील चकित केले. याचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण हत्या झालेली महिला तब्बल ७ वर्षानंतर जिवंत सापडली आहे. एवढेच नाही तर या महिलेच्या हत्येप्रकरणी दोन जणांनी जवळपास अडीच ते तीन वर्षे तुरुंगावस देखील भोगला आहे. आता महिला आल्याने सापडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात व्यस्त आहेत.
उत्तर प्रदेशातील कौशी येथे राहणारी आरती काही वर्षांपूर्वी दौसाच्या मेहदीपूर बालाजीमध्ये राहू लागली होती. इथे ती छोटीमोठी कामे करून उदरनिर्वाह करायची. इथेच तिची भेट सोनू सैनी नावाच्या व्यक्तीशी झाली. दोघांचा संपर्क वाढल्यावर त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले, मग ते एकत्र राहू लागले. लग्नानंतर काही दिवसांनी आरती बेपत्ता झाली होती. आरती बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी वृंदावन येथील कालव्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता.
कपड्यांच्या आधारे वडिलांनी ओळखीचा केला दावा
संबंधित मृतदेहाची ओळख पटली नाही तरीदेखील पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर आरतीचे वडील त्या पोलीस ठाण्यात गेले आणि फोटो आणि कपड्याच्या आधारे ती आपली मुलगी आरती असल्याचा दावा केला. त्यानंतर आरतीच्या वडिलांनी २०१५ मध्ये वृंदावन येथील सोनू सैनी आणि दौसा येथील गोपाल सैनी यांच्या विरोधात तिच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी राजस्थानमध्ये येऊन दोघांना केली अटक
याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या वृंदावन पोलिसांनी दौसा येथे जाऊन आरतीच्या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले. ते ओरडत राहिले पण पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. नंतर सोनू सैनी आणि गोपाल सैनी सुमारे अडीच ते तीन वर्षे तुरुंगात राहिले आणि नंतर जामिनावर बाहेर आले. जामिनावर बाहेर आल्यानंतर पीडित व्यक्तींनी तपास केला असता दौसा येथील विशाला गावात आरती ही महिला जिवंत आढळून आली.
आरतीला पोलिसांना घेतलं ताब्यात
यावर पीडितांनी मेहंदीपूर बालाजी स्टेशन हाऊस ऑफिसर अजित बडसारा यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. पीडितांची कहाणी ऐकल्यानंतर मेहंदीपूर बालाजी पोलिसांनी बैजूपाडा परिसरातून आरती या महिलेला अटक केली आहे. त्यानंतर मेहंदीपूर बालाजी पोलीस ठाण्याने उत्तर प्रदेशच्या वृंदावन पोलिसांना दौसा येथे बोलावले. दौसा पोलिसांनी आरतीला वृंदावन पोलिसांच्या ताब्यात दिले. लक्षणीय बाब म्हणजे तपासात असे समोर आले की, याआधी सोनू सैनीसोबत आरतीने लग्न केले होते, नंतर तिचे लग्न भगवान सिंग रेबारीसोबत झाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"