तुफान राडा! मंत्र्यांसमोर भिडले भाजपाचे आमदार आणि पदाधिकारी; लाथा-बुक्क्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 08:29 AM2022-06-10T08:29:37+5:302022-06-10T08:31:09+5:30
BJP Leaders Clash : सर्किट हाऊसमध्ये मंत्री जितिन प्रसाद यांच्या भेटीत मनमोहन सैनी आणि शहराचे आमदार रितेश गुप्ता यांच्यात वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये तुफान राडा झाला आहे. मंत्र्यांसमोरच भाजपाचे आमदार आणि पदाधिकारी एकमेकांना भिडले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. गुरुवारी रात्री मुरादाबाद सर्किट हाऊस येथे राज्याचे PWD मंत्री जितिन प्रसाद यांच्या उपस्थितीत, काही लोकांनी भाजपा मागासवर्गीय मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मनमोहन सैनी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
सर्किट हाऊसमध्ये मंत्री जितिन प्रसाद यांच्या भेटीत मनमोहन सैनी आणि शहराचे आमदार रितेश गुप्ता यांच्यात वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला. भाजपाचे काही कार्यकर्ते आमदाराला रोखण्यासाठी देखील पुढे आले. शेवटी कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत परिस्थिती एवढी बिघडली की, आमदारामुळे मंत्र्यांना सभा अर्धवट सोडून उठावे लागले. सभेतील या वादानंतर काही वेळातच सर्किट हाऊसमध्ये मनमोहन सैनी यांना मारहाण करण्यात आली. यावेळी सर्किट हाऊसमध्ये मंत्रीही उपस्थित होते.
योगी सरकारचे पीडब्ल्यूडी मंत्री जितिन प्रसाद गुरुवारी संध्याकाळी उशीरा मुरादाबादला पोहोचले. रात्री त्यांनी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सर्किट हाऊसवर बैठक बोलावली. यामध्ये ते प्रत्येकाला आपापल्या भागातील समस्या विचारत होते. या बैठकीत उपस्थित असलेले भाजपा मागासवर्गीय मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनमोहन सैनी यांनी विकासाचा मुद्दा उपस्थित केला, असे या बैठकीत उपस्थित असलेल्या भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यावेळी मनमोहन म्हणाले की, आपण आमदार असूनही प्रकाश नगर चौक आणि लाइनपार परिसराचा विकास होत नाही.
हे ऐकताच सभेत मंत्र्यांच्या शेजारी बसलेले भाजपाचे आमदार रितेश गुप्ता यांचा पारा चढला. खुर्चीवरून उठलेल्या आमदाराने मनमोहन सैनी यांच्यावर दादागिरी करायला सुरुवात केली. आधी दोघांमध्ये वाद झाला. नंतर संतापलेल्या आमदाराने तू माझं नाव कसं घेतलंस? असा प्रश्न विचारला. आमदार रितेश गुप्ता आणि मनमोहन सैनी यांच्यात जोरदार वाद सुरू असताना मंत्री जितिन प्रसाद शांतपणे त्यांच्या खुर्चीत बसले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.