रामलीला सुरू असताना 'राम-राम' म्हणत दशरथानं खरंच प्राण सोडला; उपस्थितांना अभिनय वाटला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 02:00 PM2021-10-17T14:00:23+5:302021-10-17T14:02:22+5:30
राम वनवासाला गेल्यानंतर व्याकूळ होत दशरथ खाली कोसळला; हृदय विकाराच्या झटक्यानं निधन
बिजनौर: उत्तर प्रदेशातील बिजनौरच्या हसनपूरमध्ये रामलीला सुरू असताना एका कलाकाराचा मृत्यू झाला आहे. दशरथाची भूमिका साकारत असलेल्या राजेंद्र सिंह यांनी रामलीला सुरू असतानाच प्राण सोडला. राजेंद्र सिंह अभिनय करत असल्याचा उपस्थितांचा समज झाला. मात्र बराच वेळ ते निपचित पडून होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. राजेंद्र सिंह यांनी रंगमंचावरच प्राण सोडले होते.
हसनपूर गावात रामलीला सुरू होती. प्रभू श्रीराम वनवासाला जात असतानाचा प्रसंग होता. पुत्र वियोगानं दशरथ व्याकूळ होतात आणि राम राम म्हणत प्राण सोडतात, असा प्रसंग रंगमंचावर सुरू होता. राजेंद्र सिंह दशरथाची भूमिका साकारत होते. प्रभू रामचंद्र वनवासाला निघून जाताच दशरथाची भूमिका वठवत असलेले राजेंद्र सिंह व्याकूळ झाले. ते रंगमंचावर कोसळले आणि बराच वेळ उठलेच नाहीत. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला.
रामाच्या विरहाचा अभिनय करताना राजेंद्र सिंह कोसळले. त्यानंतर पडदा पडला. राजेंद्र सिंह हालचाल करत नसल्यानं सहकलाकारांनी त्यांच्याजवळ धाव घेतली. दशरथाची भूमिका साकारत असलेल्या राजेंद्र यांनी खरोखरच प्राण सोडल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर परिसरावर शोककळा पसरली. २ ऑक्टोबरपासून हसनपूरमध्ये रामलीला सुरू होती. राम वनवासाला जात असल्याचा प्रसंग १४ ऑक्टोबरला होता. त्या प्रयोगावेळी राजेंद्र यांची प्राणज्योत मालवली. गेल्या २० वर्षांपासून राजेंद्र सिंह दशरथाची भूमिका साकारत होते.