पोलिसाला राखी बांधणाऱ्या महिलेविरोधात देवबंदच्या उलेमांनी जारी केला फतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 11:27 AM2018-08-28T11:27:04+5:302018-08-28T11:31:35+5:30
उत्तर प्रदेशात रक्षाबंधन सण साजरा करणाऱ्या महिलेविरोधात देवबंदच्या उलेमांनी फतवा काढल्याची घटना घडली आहे.
सहारनपूर - रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण. रविवारी (26 ऑगस्ट) देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र उत्तर प्रदेशात रक्षाबंधन सण साजरा करणाऱ्या महिलेविरोधात देवबंदच्या उलेमांनी फतवा काढल्याची घटना घडली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी उत्तर प्रदेशात एका पोलीस अधिकाऱ्याला राखी बांधणाऱ्या मुस्लिम महिलेला समस्यांचा सामना करावा लागत आहे. या महिलेविरोधात देवबंदच्या उलेमांनी फतवा काढला आहे. देवबंदनं याबाबत सांगताना म्हटले की, इस्लाममध्ये परपुरुषाला स्पर्श करणं किंवा बुरख्याशिवाय परपुरुषासमोर जाणं निषिद्ध आहे. अशात राखी बांधणे हेदेखील गैरइस्लामिक मानले गेले आहे.
नेमकी काय आहे घटना?
उत्तर प्रदेशातील पोलिसातील डीजीपी ओम प्रकाश सिंह यांनी पोलीस आणि जनतेतील संबंध सुधारण्यासाठी रक्षाबंधन सणानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळेस परिसरातील काही महिलांकडून पोलिसांनी राखी बांधून घेतली आणि सुरक्षिततेचे आश्वासन दिले. या उपक्रमांतर्गत निरनिराळ्या परिसरात पोलिसांनी स्थानिक महिलांकडून राखी बांधून घेतली.
'राखी बांधण्यासाठी परपुरुषाला स्पर्श करावा लागतो'
रक्षाबंधनाच्या दिवशी संपूर्ण उत्तर प्रदेशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांकडून राखी बांधून घेतली आणि त्यांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं. मात्र, या कार्यक्रमावर देवबंदकडून आक्षेप घेण्यात आला आणि उलेमांनी मुस्लिम महिलांनी पोलिसांना राखी बांधणं निषिद्ध असल्याचं ठरवलं. इस्लाममध्ये राखी बांधण्यास मुस्लिम महिलांना परवानगी नाही, असेही देवबंदकडून सांगण्यात आले.