धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 09:51 PM2024-11-04T21:51:30+5:302024-11-04T21:55:13+5:30
स्थानिक डायव्हर्सच्या मदतीने जवळपास दोन तासांनंतर चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला केला...
उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील सैदपूर नगर येथील पक्का घाट येथे सोमवारी सकाळच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. येथे आपल्या आजीच्या (आईची आई) घरी आलेल्या एका 4 वर्षाच्या चिमुकलीचा आईसमोरच गंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. घटने दरम्यान चिमुकलीची मावशी मोबाईलवर घरातील सदस्यांची आंघोळीची रील बनवत होती. यात चिमुकलीचे बुडतानाचे दृष्यही रेकॉर्ड झाले. स्थानिक डायव्हर्सच्या मदतीने जवळपास दोन तासांनंतर चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला केला.
वाराणसीतील चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरा गावातील रहिवासी संदीप पांडे यांची पत्नी अंकिता, चार वर्षांची एकुलती एक मुलगी तान्याला घेऊन छठसाठी सैदपूर भागातील बौरवान गावात आपल्या माहेरी आली होती. कपिल मिश्रा असे तिच्या वडिलांचे नाव. अंकिता सोमवारी तिची 4 वर्षांची मुलगी, आई लक्ष्मीना, बहीण स्मृती आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह सैदपुर नगर येथील पक्का घाटावर छठपूजेच्या निमित्ताने गंगा स्नानासाठी आली होती. तिथे तान्या, तिची आई आणि आजी कुटुंबातील इतर मुलांसह गंगा नदीत स्नान करत होत्या. यावेळी तान्याची मावशी स्मृती बाहेरून सगळ्यांच्या अंघोळीची व्हिडीओ रील बनवत होती.
आंघोळ करत असताना तान्या अचानक खोल पाण्यात गेली आणि बुडू लागली. काही वेळातच तान्या गंगेत बुडाली. तान्या बुडत असताना तिची मावशी बहिणीचा आणि इतर लोकांचा व्हिडिओ बनवत होती. या व्हिडीओमध्ये मुलगी बुडतानाही दिसत आहे. मात्र, हे कुणाच्याही लक्षात आले नाही. बराच वेळ तान्या न दिसल्यानंतर, कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. यानंतर, काही वेळातच कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. जेव्हा सर्वांनी व्हिडिओ पाहिला तेव्हा तान्या बुडताना दिसली. यानंतर स्थानिक लोकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
यानंतर, काही वेळातच घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक डायव्हर्स अथवा गोताखोर आणि पोलिसांच्या मदतीने घटनेनंतर सुमारे दोन तासांनी तान्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यानंतर, तान्याला तातडीने सार्वजनिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर, सय्यदपूर चौकीचे प्रभारी मनोजकुमार पांडे यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.