आईची जळणारी चिता पाहून मुलाचाही श्वास थांबला; दोघांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 10:47 AM2023-06-22T10:47:30+5:302023-06-22T10:53:41+5:30
मोठा मुलगा राजेश गुप्ता याने आईला मुखाग्नी दिला. मात्र चिता पेटवल्यानंतर काही वेळातच राजेशचाही मोठा धक्का बसल्याने मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ओबरा पोलीस स्टेशन हद्दीतील व्हीआयपी रोडवर राहणाऱ्या हिरामणी यांचा बुधवारी दुपारी अचानक मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबातील मोठा मुलगा राजेश गुप्ता आणि लहान मुलगा सुरेश गुप्ता घरी पोहोचले होते. मोठा मुलगा राजेश गुप्ता मुंबईत कामाला होता आणि आईच्या निधनाची बातमी समजताच तो ओबरा येथे आला.
आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांनी तिला चोपन येथील सोन नदीच्या काठावर नेले, तेथे मोठा मुलगा राजेश गुप्ता याने आईला मुखाग्नी दिला. मात्र चिता पेटवल्यानंतर काही वेळातच राजेशचाही मोठा धक्का बसल्याने मृत्यू झाला. उपस्थित लोकांनी राजेशला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आईच्या आणि मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आईच्या जळत्या चितेसमोर कुटुंबातील मोठ्या मुलाचा श्वास अचानक थांबला, त्यामुळे कुटुंबीय आणि गावात शोककळा पसरली आहे. माताजी हिरामणी यांचे निधन झाल्याचे लहान भाऊ सुरेश कुमार गुप्ता यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना अंत्यसंस्कारासाठी चोपन स्मशानभूमीत आणण्यात आले आणि मोठा भाऊ राजेश गुप्ताही अंत्यसंस्कार करण्यासाठी आले होते.
आईची जळणारी चिता पाहून मोठा भाऊ राजेश गुप्ता यांचा मृत्यू झाला. तेथे बसलेल्या लोकांनी त्याला पाहताच तातडीने चोपन सामुदायिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची माहिती दिली. राजेश गुप्ता हे मुंबईत राहत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.